नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञान परंपरेचे संशोधन तसेच विस्तृत ज्ञान प्राप्त करणे शक्य होणार आहे. याबाबत हिंदू धर्म संस्कृती मंदिरा सोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.
भारतातील वैविध्यपूर्ण असा प्राचीन ज्ञानाचा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा. तत्कालीन प्रगत भारतीय ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ याचा समावेश करण्यात आला आहे. एनईपी २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासता यावी. यावर अधिक संशोधन करता यावे म्हणून विद्यापीठाने हिंदू धर्म संस्कृती मंदिरा सोबत सामंजस्य करार केल्याचे विद्यापीठाने त्यांच्या निवेदनात सांगितले.
हेही वाचा : सावधान! ‘या’ राज्यांमध्ये बनावट कागदपत्रांवर चोरीच्या वाहनांची नोंदणी, चेसिससह इंजिन क्रमांक…
हिंदू धर्म संस्कृती मंदिर या संस्थेकडे प्राचीन ग्रंथसंपदेचे भव्य असे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये साधारणतः ७० हजारांच्या आसपास प्राचीन ग्रंथांचा संग्रह करण्यात आला आहे. या प्राचीन ग्रंथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेवर संशोधन करण्यास मदत मिळणार आहे. यामुळे विद्यापीठाने या संस्थेसोबत सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश सिंह आणि हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्या वतीने डॉ. सुधाकर इंगळे व मंगेश श्रीराम जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे.
हेही वाचा : नागपुरातील नऊ रस्ते वाहतुकीसाठी बंद, महापालिका म्हणते…
प्राचीन साहित्यावर संशोधन होणार
भारतीय प्राचीन ज्ञानासंबंधी साहित्य हिंदू धर्म संस्कृती मंदिर त्यांच्याकडे संरक्षित आहे. नागपूर विद्यापीठात भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास करू इच्छिणारे संशोधक तसेच विद्यार्थ्यांना हिंदू धर संस्कृती मंदिर यांच्याकडील प्राचीन भारतीय साहित्य संशोधनाकरिता हाताळता येणार आहे. विद्यापीठ तसेच हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्या दरम्यान शैक्षणिक आदान प्रदान देखील केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक संशोधन देवान घेवान देखील होणार आहे. या सोबतच परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, सिम्पोजियम, विविध स्पर्धा, श्रेयांक बदल आधी विविध उपक्रम राबविणे शक्य होणार आहे.