नागपूर : विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडलेले असताना हिवाही परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. हिवाळी-२३ परीक्षा १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. हिवाळी-२३ परीक्षेचे नियोजन करण्याबाबत परीक्षा पूर्वतयारी बैठक परीक्षा भवन येथे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. यावेळी पुनर्मूल्यांकनाचे निकाल तातडीने लावण्याचे निर्देश देखील डॉ. दुधे यांनी बैठकीत दिले.
हेही वाचा >>> अबब; ॲनाकोंडा सदृश महाकाय अजगर! तीन शेळ्या गिळल्या, गावकऱ्यांना धोका
परीक्षा भवन येथे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हिवाळी-२३ परीक्षेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. हिवाळी परीक्षेचे वेळापत्रक, विद्यापीठ परीक्षेत्रातील परीक्षा केंद्र, परीक्षार्थी विद्यार्थी, केंद्रप्रमुख त्याचप्रमाणे परीक्षेकरिता आवश्यक साहित्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली. हिवाळी परीक्षेबाबत विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना अडचणी येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश डॉ. दुधे यांनी दिले. परीक्षा सुरळीत पार पाळण्याकरिता परीक्षा केंद्रांवर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. पुनर्मूल्यांकन निकाल तातडीने घोषित करण्याचे निर्देश प्र-कुलगुरु डॉ. दुधे यांनी बैठकीमध्ये दिले. सोबतच हिवाळी-२३ परीक्षेचे मूळ निकाल घोषित झाल्यानंतर लगेच पुनर्मूल्यांकन प्रक्रियेची कारवाई तातडीने करावी असे देखील त्यांनी सांगितले.