नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर करारानुसार भरवले जाते. येथे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होऊन या भागातील प्रश्न सुटणे अपेक्षित आहे. पण, राज्यकर्ते आणि विदर्भातील आमदार त्याबाबत उदासिन आहेत. यामुळे संतप्त होऊन विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणा दिल्या. त्यासाठी कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे, असे पत्रकार व विदर्भाचे खंदे समर्थक प्रकाश पोहरे यांनी म्हटले आहे. त्यांनी नागपूर पत्रकार क्लब येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बालके अनौपचारिक शिक्षण, पोषण आहारला महिनाभर मुकणार; सरकार-कर्मचारी संघटनांची चर्चा फिस्कटली

ते म्हणाले, नागपूर करारानुसार सहा आठवड्यांचे अधिवेशन होणे अपेक्षित आहे. यावर्षी ७ ते २० डिसेंबर या कालावधीत अधिवेशन होत आहे. म्हणजे केवळ दोन आठवड्यांचे हे अधिवेशन आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. विदर्भात दररोज १४ शेतकरी आत्महत्या होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून विदर्भाचे प्रश्न रेंगाळत ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. बेरोजगारी, नक्षलवाद, कुपोषण आदी विदर्भाच्या समस्या आहेत. विदर्भात वीज निर्माण होते, पण येथील शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळत नाही. या गंभीर विषयावर सभागृहात कुणीही बोलायला तयार नाही. विदर्भवादी म्हणून त्या दिवशी माझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यानंतर मी कोणत्याही कारवाईस सामोरे जाण्यास तयार आहे. विदर्भाच्या समस्येवर चर्चा होत नसेल, येथील प्रश्नांवर तोडगा काढता येत नसेल तर नागपूर अधिवेशनाचे ढोंग कशाला करायचे, असे प्रश्न उपस्थित करत पत्रकार गॅलरीतून बाहेर आलो. नागपूर येथे होणारे अधिवेशन केवळ सहलीपुरते मर्यादित राहू नये. आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या चीड आणणाऱ्या बाबी विदर्भातील आमदारांना दिसत नाहीत का ? असा प्रश्नही पोहरे यांनी याप्रसंगी उपस्थित केला. याप्रसंगी नवी दिल्ली येथील काऊन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्सचे अध्यक्ष बॅरि. विनोद तिवारी, पत्रकार कृष्णा नागपाल प्रामुख्याने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur vidhan bhavan journalist prakash pohare agitation for vidarbh problems from press gallery rbt 74 css