नागपूर : विकृत समुपदेशक विजय घायवटविरुद्ध अनेक तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या तक्रारी देण्यासाठी समोर येत आहेत. आतापर्यंत तीन अल्पवयीन मुली आणि एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. नव्याने गुन्हा दाखल झाल्यामुळे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी विजय घायवटला मध्यवर्ती कारागृहातून अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर घायवटची पुन्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानेवाडातील विकृत समूपदेशक विजय घायवट याच्याकडे दहाव्या वर्गात असलेली एक मुलगी समूपदेशनासाठी आली होती. घायवटने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सहा वर्षे लैंगिक अत्याचार केला. सध्या ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून तिच्या अनेक अश्लील चित्रफिती घायवटने काढल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अर्धवट शिक्षण झालेला विजय घायवट याने १५ वर्षांपूर्वी मानेवाडा रस्त्यावरील बाकडे सभागृहामागे स्वतःच्या घरात अवैधरित्या मनोविकास नावाने निवासी मानसोपचार केंद्र उघडले होते. घायवटने अधिकृत शिक्षण नसतानाही समूपदेशन करण्यास सुरुवात केली. अनेक पालकांना त्याने विश्वासात घेऊन निवासी केंद्रात टाकण्यास बाध्य केले. परीक्षा किंवा घरातील परिस्थिती, प्रेमात दगा मिळाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या मुली-तरुणी आणि महिला त्याच्याकडे समूपदेशनासाठी येत होत्या. तो नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या शाळकरी मुली आणि तरुणींना समूपदेशन करताना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. आतापर्यंत विजय घायवट याने दीडशेवर मुली-तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. दहाव्या वर्गातील एका मुलीच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यामुळे ती नैराश्यात गेली. तिच्या नातेवाईकांनी तिला घायवटच्या मनोविकास केंद्रात दाखल केले. ती मुलगी दहावीत असतानाच घायवटने तिला जाळ्यात ओढले. ती अल्पवयीन असतानाच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. आईवडिलाच्या मृत्यूनंतर तिला स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या ती मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून तिला घायवटने अजूनही सोडलेले नाही. तिला पत्नीप्रमाणे वागणूक देऊन तिच्यावर लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पत्नी-प्रेयसी अद्यापही फरार

विजय घायवट याच्या अश्लील कृत्यात पत्नी व दोन प्रेयसी सामिल होत्या. पत्नी आणि प्रेयसींसमोरच घायवट हा लैंगिक अत्याचार करीत होता. तसेच त्याची पत्नी अनेक तरुणींना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार करीत होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या पत्नीसह दोनही प्रेयसींवर गुन्हे दाखल केले. मात्र, त्या तिघीही फरार झाल्या असून पोलिसांना अद्याप सापडल्या नाहीत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur vijay ghaywat again sent to jail adk 83 ssb