Nagpur Violence : नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यासाठी आज (२४ मार्च) सकाळीच महापालिकेचं पथक पोहचलं होतं. तसेच फहीम खानच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सांगितली जात आहे.
नागपूर शहरात १७ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. यानंतर पोलिसांनी ५० दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये फहीम खानलाही १८ मार्च रोजी अटक करण्यात आलेली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खान हा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. फहीम खानने जमावाला भडकवून हिंसा घडवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर असून फहीम खान सध्या कोठडीत आहे.
दरम्यान, राजकीय दबावाखाली आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप फहीम खानने केला आहे. तसेच जामीन मिळण्यासाठी फहीम खानने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, आज आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
#WATCH | Maharashtra: Police in Nagpur arrive at the residence of Nagpur violence accused Faheem Khan, with a bulldozer. pic.twitter.com/pJenvIVcZu
— ANI (@ANI) March 24, 2025
कोण आहे फहीम खान?
फहीम शमीम खान हा ३८ वर्षीय स्थानिक राजकीय नेता असून तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमपीडी) या पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. फहीम खानने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. यात त्याला १०३७ मते मिळाली असून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर तो स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय झाला आणि आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. फहीम खान हा यशोधरा नगर येथील रहिवासी आहे, त्याचे वडील सिलेंडर दुरुस्तीचे काम करतात. फहिम अध्यक्ष असलेली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी ही छत्तीसगड आणि मध्यप्रदेश येथील सुन्नी युथ फोर्स सोबत संलग्नित आहे.