Curfew in Nagpur : नागपुरात कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी रात्री (१७ मार्च) मोठा तणाव निर्माण झाला. दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेमुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अधिसूचनेतून समोर आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील. कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे. तसंच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रभावित भागातील रस्ते बंद करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणारा कोणीही भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय राहील.

दरम्यान, नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी रहिवाशांना आश्वासन दिले की परिस्थिती आता नियंत्रणात आहे. ते म्हणाले, “सध्या परिस्थिती शांत आहे. एक फोटो जाळण्यात आला, त्यानंतर लोक जमले. या गर्दीला पांगवण्याचा आम्ही प्रयत्न केला. या संदर्भात आम्ही कारवाईही केली. आरोपींवर कारवाई केली जाईल.”

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय?

“नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.