Nagpur Violence: सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून, महाल परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली. या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. यानंतर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंघल यांनी पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहील असे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात आतापर्यंत २० ते २२ पोलिस जखमी झाले आहेत. त्याच वेळी, ६० हून अधिक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी थरारक अनुभव सांगितले आहे.
धारदार शस्त्रे, स्टिक्स आणि बाटल्या…
तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेवर बोलताना हंसापुरी भागातील एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलेने सांगितले की, “एक जमाव येथे आला, त्यांचे चेहरे स्कार्फने झाकलेले होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, स्टिक्स आणि बाटल्या होत्या. त्यांनी गोंधळ सुरू केला, दुकानांची तोडफोड केली आणि दगडफेक केली. यावेळी त्यांनी वाहनेही जाळली.”
…तेव्हा माझ्यावर दगडफेक
दरम्यान हंसापुरी भागातील एका स्थानिक दुकानदाराने सांगितले की, “रात्री १०.३० वाजता मी माझे दुकान बंद केले. अचानक, मला लोक वाहने जाळताना दिसले. मी आग विझवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्यावर दगडफेक करण्यात आली. माझी दोन वाहने आणि जवळच उभ्या असलेल्या काही इतर वाहनांना जमावाने आग लावली.”
सर्वात आधी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले
आणखी एक स्थानिकाने सांगितले की, “संपूर्ण घटनेच्या दीड तासानंतर, पोलीस येथे आले. ज्या लोकांनी हे केले त्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना लक्ष्य केले आणि त्यांचे नुकसान केले.” याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
स्थानिक आमदार काय म्हणाले?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे स्थानिक आमदार प्रवीण दटके म्हणाले, “मी आज सकाळीच येथे पोहोचलो आहे. हे सर्व पूर्वनियोजित होते. काल सकाळी झालेल्या आंदोलनानंतर गणेश पेठ पोलीस ठाण्यात एक घटना घडली, त्यानंतर सर्व परिस्थिती सामान्य झाली होती. नंतर, जमाव फक्त हिंदू घरे आणि दुकानांमध्ये घुसला. प्रथम, सर्व कॅमेरे तोडण्यात आले आणि नंतर पूर्वनियोजित पद्धतीने शस्त्रांसह हिंसाचार करण्यात आला.”