Irfan Ansari Deth In Nagpur Violence: नागपुरात सोमवारी दोन गटात उसळलेल्या हिंसाचारात इरफान अन्सारी (३८, रा. गरीब नवाज नगर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराच्या दिवशी इरफानला जमावाने मारहाण केल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती, त्यानंतर आज त्याचा मृत्यू झाला. इरफानच्या मृत्यूनंतर, “पुढे असं कोणासोबतही घडून नये”, असं मृत तरुणाचा भाऊ इम्रान सानी यांनी म्हटले आहे.

त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण…

नागपूर हिसांचार आणि भावाच्या मृत्यूबाबत बोलताना इरफान अन्सारीचा भाऊ इम्रान सानी म्हणाले की, “आम्ही त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला यश आले नाही, डॉक्टरांनी त्याच्यावर चांगले उपचार केले, पण ते त्याला वाचवू शकले नाहीत.”

कोणाबरोबरही अशी दुर्दैवी घटना घडू नये

त्यांनी पुढे सांगितलं की,”माझा भाऊ इरफान अन्सारी एका ऑटोने इटारसी जंक्शन रेल्वे स्थानकाला निघाला होता. त्यादरम्यान ऑटो चालकाने त्याला सांगितलं की, वातावरण चांगलं नसल्यानं पुढं जाणार नाही. त्यानंतर माझ्या भावाने रेल्वे स्थानकावर चालत जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर इतका जोरदार हल्ला केला की तो बेशुद्ध पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, पाय फ्रॅक्चर झाला, पाठीला दुखापत झाली. त्याच्यावर जमावाने हल्ला केला. या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. भविष्यात, कोणाबरोबरही अशी दुर्दैवी घटना घडू नये.”

पोलीस बंदोबस्त वाढवला

दरम्यान सोमवारी झालेल्या मारहाणीनंतर इरफान अन्सारी या तरुणाचा आज (शनिवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. इरफानच्या मृत्यूची बातमी समोर येताच मेयो रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मेयो रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याचबरोबर सशस्त्र जवान सुद्धा या भागात तैनात केले आहे.

दरम्यान पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडून नये म्हणून मोमीनपुरा, हंसापुरी, चिटणीस पार्क चौक आणि भालदार पुरा यासह तहसील, लकडगंज, गणेश पेठ या भागातसुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, या हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader