नागपूर : मध्यनागपुरातील महाल-हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शहरातील ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर गुरूवारी यात काही दिलासा देत नंदनवन व कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णत: हटविण्यात आली. आता पुन्हा ५ ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णत: हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

यामध्ये परिमंडळ ३ अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज तसेच परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या सक्करदरा आणि इमामवाडाचा समावेश आहे. मात्र, यशोधरानगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. तर कोतवाली, तहसील, गणेशपेठमध्ये सायंकाळी ७ ते रात्री १० वाजतापर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री भालदापुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी या भागात जाळपोळ व हिंसाचार झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली होती. यातील बहुतांश भाग हे बाजारपेठांचे भाग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनादेखील अडचण होत होती.

मागील ५ दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शनिवारी पोलिस आयुक्तांकडून स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णत: हटविण्याचे निर्देश दिले. तर परिमंडळ तीनमधील कोतवाली, तहसील, गणेशपेठ हद्दीतील संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्यात आली.

सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत लोक बाहेर पडू शकतात आणि या वेळेत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी होऊ शकते असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. टप्प्याटप्प्यात पुढील शिथिलता आणण्यात येणार आहे. मात्र, यशोधरानगर पोलीस ठाण्यांतील नागरिकांना मात्र दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा पूर्ण आठवडा संचारबंदीतच जाण्याची चिन्हे आहेत.

आदेश भंग केल्यास कारवाई

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, संबंधित ठाण्यांतर्गत कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता निर्णयात घेण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना असतील. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम २२३ अंतर्गत कार्यवाही केली जाईल. पोलीस अधिकारी, अग्निशमन पथक, आवश्यक सेवा, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हे नियम लागू होणार नाही. तसेच परीक्षा देणारे विद्यार्थी आणि संबंधित व्यक्तींनाही या प्रतिबंधातून मुक्त ठेवण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थिती कायम असेल.