लोकसत्ता टीम
नागपूर: बुधवारी रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्याची उपराजधानी पाण्यात तुंबली. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या उपराजधानीच्या प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरले.
आणखी वाचा-नागपुरातील भुयारी मार्ग सोयींपेक्षा गैरसोयीचेच अधिक? कारणे काय?
बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरु होता. विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाने थैमान घातले. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी शिरले होते. तर पॉश समजल्या जाणाऱ्या वस्त्यादेखील पाण्याखाली होत्या. विदर्भात सर्वत्र पाऊस असला तरीही शहरात मात्र अजूनपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मात्र, बुधवारी रात्रीपासून तर पहाटेपर्यंत झालेल्या पावसामुळे शहरात दाणादाण उडाली. अपार्टमेंट पाण्याखाली गेले. घरांमध्ये पाणी शिरले आणि रस्त्याच्या मात्र नद्या झाल्या होत्या. अनेकांची वाहने पाण्यात बुडाली. शहराच्या काही भागात दुचाकी पाण्यात वाहून गेल्याच्या देखील घटना घडल्या. ठिकठिकाणचे कॉल असल्याने अग्निशमन विभागाची सुद्धा तारांबळ उडत होती.