नागपूर : अंबाझरी तलावाजवळील पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने येथील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. अंबाझरी टी- पॉईंट ते विवेकानंद स्मारक दरम्यानचा मार्ग बंद केला गेला आहे. उपलब्ध केलेला पर्यायी मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होणे नित्याचे झाले आहे. नागपूर पोलिसांना वाहतूक कोंडी सोडविण्यास अपयश आल्याचा मुद्दा माजी मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित केला.

गोपालनगर, सुभाषनगर, दीक्षाभूमी, प्रतापनगर, शंकरनगर चौक, एलएडी कॉलेज चौक, बजाजनगर, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, अभ्यंकरनगर चौक, विश्वेश्वरय्या चौक, दीनदयाल चौकातील रस्ते बंद असल्याने येथील परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अंबाझरी मार्ग सुरू होईपर्यंत या मार्गाने जाणाऱ्या जड वाहनांकरिता वाहतूक बंद करण्यात यावी. तसेच व्हीएनआयटी येथील प्रवेशद्वार उघडल्यास नागरिकांना सोयीचे ठरत असल्यामुळे हे प्रवेशद्वार उघडण्यात यावे. हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याने त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असेही यावेळी डॉ. राऊत म्हणाले.

हेही वाचा – भंडारा : ‘सर आली धावून, रस्ता गेला वाहून…’

नागपूर शहरात ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण होऊन पाऊस झाल्यामुळे नागपूर शहरात अंबाझरी तलावातील विसर्गाचे पाणी शहरातील सखल भागात तसेच नागरी वस्तीमध्ये १० फूट पाणी लोकांच्या घरात शिरले होते. सदर ठिकाणी तलावलगत स्वामी विवेकानंद यांचा २० फुट उंच पुतळा उभारला असल्यामुळे तलावाचे पाणी नागरीवस्त्यामध्ये शिरले होते. त्यामुळे या घटनेत ५ नागरिकांना जीव गमवावा लागला होता.

अशीच परिस्थिती वर्ष २०१९ चे हिवाळी अधिवेशन सुरु असताना निर्माण झाली होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी भविष्यात पुराची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून स्वामी विवेकानंद यांचा पुतळा हाटविण्याबाबत शासनास कळविले होते. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

जलसंपदा विभागाने देखील अंबाझरी तलावच्या ५० मीटरच्या आत कुठलेही विकास कार्य करता येणार नाही, असा शासन निर्णय काढला, परंतु शासनाने सर्व नियम बाजूला ठेवून तलावाला लागून स्वामी विवेकानंद स्मारकाचे बांधकाम केले, तसेच मुरारका डेव्हलपर्सने कोणत्या नियमाने याठिकाणी बांधकाम केले या बांधकामांना कोणी परवानगी दिली. यावर चौकशी होऊन कारवाई होणार काय? पुतळा वाचवणे महत्वाचे की लोकांचा जीव वाचविणे महत्वाचे? असा प्रश्न डॉ. राऊत यांनी सभागृहात उपस्थित केला.

हेही वाचा – वर्धा : लाडक्या बहिणींना पावसाळी छत्र्यांचे वाटप

नाल्याची सुरक्षा भिंत आणि रस्ते बांधण्याची मागणी

महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून महापालिका आयुक्त आणि नासुप्र सभापती काही ठराविक मतदारसंघात निधीची तरतूद करीत आहेत. हे दोन्ही कार्यालयाचा कारभार एका राजकीय पक्षाप्रमाणे चालला आहे, असा आरोप माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केला आहे. पावसाळ्यापूर्वी पिवळी नदी आणि चांभार नाल्यावरील सुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यात यावे. तसेच उत्तर नागपुरात रस्त्याचे बांधकाम आणि दुरुस्ती व मलवाहिका टाकण्याची कामे करण्याची विनंती उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली. राज्य सरकार निधी वितरित करताना दुजाभाव करीत असल्याने उत्तर नागपुरात विकासकामाचा सुकाळ असल्याची परिस्थिती आहे. उत्तर नागपुरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डॉ. राऊत यांनी केला आहे.