शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्करोग विभागात महिनाभरापासून किमोथेरपीपूर्वी दिले जाणारे औषध नाही, इंजेक्शन व साध्या औषध मिळत नाही. ते बाहेरून घेण्यासाठी नातेवाईकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे या रुग्णांचा वाली कोण? असा प्रश्न करत रुग्णांनी मरायचे काय? हा प्रश्न घेऊन संतप्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक काल (बुधवार) थेट अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या कार्यालयात धडकले.
हे देखील वाचा – विदर्भात मागील सात महिन्यात ८१० शेतकऱ्यांची आत्महत्या
मध्य भारतातील कर्करोगग्रस्तांच्या उपचाराचे एकमात्र शासकीय केंद्र म्हणून मेडिकलच्या कर्करोग विभागाची ख्याती आहे. येथे गरिबांना मोफत उपचार मिळतात. परंतु महिनाभरापासून येथे येणाऱ्या कर्करोगग्रस्तांना किमोथेरपीपुर्वी दिले जाणारे औषध, इंजेक्शन व औषधही मिळत नाही. हे औषध बाहेरून घेण्याची आमची ऐपत नाही. त्यामुळे औषधांअभावी रुग्णांची मरायचं का? असा प्रश्न उपस्थित करत अधिष्ठाता कार्यालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अश्रूला वाट मोकळी करून दिली.
औषधोपचार उपलब्ध करून देणे ही महात्मा फुले जनआरोग्य कार्यालयाची जबाबदारी, परंतु –
वैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेत येते. मेडिकल किंवा इतर शासकीय रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका संपावर अल्यानंतर रुग्णांना वेठीस धरल्यास थेट मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते, मात्र मेडिकलमध्ये औषधाशिवाय मृत्यूची प्रतीक्षा करीत असलेल्या २५ पेक्षा अधिक रुग्णांनी, तसेच नातेवाईकांनी बुधवारी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या कार्यालयावर धडक दिली. या कॅन्सरग्रस्त महिला तसेच नातेवाईकांनी आपल्या व्यथा सांगितल्या. या कॅन्सरपीडितांच्या सर्व फाईल महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मंजूर आहेत. थेट खरेदी करून त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देणे ही महात्मा फुले जनआरोग्य कार्यालयाची जबाबदारी आहे, परंतु खरेदीप्रक्रिया राबवताना अधिष्ठाता यांच्या स्वाक्षरीशिवाय खरेदीचे आदेश देता येत नाही. तर मेडिकलमधून खरेदीचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, महिनाभरापासून औषध मिळत नसल्यामुळे कॅन्सरग्रस्तांनी अधिष्ठाता कार्यालयात अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांची भेट घेतली.
हे देखील वाचा – भंडारा : सुस्थितीत आणि वापरातील शौचालय पालिकेने केले जमीनदोस्त
दरम्यान, अधिष्ठात्यांनी तातडीने रुग्णांच्या तक्रारीची दखल घेत कर्करोग विभागासह संबंधितांना कार्यालयात बोलावले. सोबत तातडीने औषधांची खरेदी करण्याची सूचना करत कुणालाही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याची सूचनाही केली.