नागपूर : गांधीनगर येथील महापालिकेच्या मैदानावरील ‘स्केटिंग रिंक’ संचलित करण्यासाठी ती खासगी व्यक्तीला देण्यास काही स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. महापालिकेचे मैदान आणि ‘स्केटिंग रिंक’ सर्वांसाठी खुले करण्याची मागणी मिहीर पटेल यांनी केली आहे.
गांधीनगर मैदानावरील ‘स्केटिंग रिंक’ गेल्या अनेक वर्षांपासून एक स्थानिक प्रशिक्षक चालवत आहे. मिहीर पटेल यांच्या म्हणण्यानुसार, कृष्णा बैसवारे बेकायदेशीरपणे ‘स्केटिंग रिंक’चा वापर करत आहेत. महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. बैसवारे यांच्यावर कारवाई करून ‘स्केटिंग रिंक’ परत घेण्यास टाळाटाळ सुरू आहे.
गांधीनगर मैदानावर बेकायदेशीरपणे ‘स्केटिंग रिंक’ चालवण्यास दिल्याप्रकरणी पटेल यांनी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे माहिती मागितली होती. परंतु माहिती देण्यात आली नाही. या ‘स्केटिंग रिंक’मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देखील उपलब्ध नसल्याचे महापालिका सांगत आहे. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे, असा आरोप पटेल यांनी केला आहे. महापालिकेचा महसूलही बुडत आहे. या महसुलबाबाबत महापालिका प्रशासन गप्प का आहे, असा सवाल पटेल यांनी केला आहे. तसेच त्यांनी स्केटिंग रिंगचे संचालक कृष्णा बैसवारे आणि महापालिका अधिकारी यांचे संगनमत आहे. त्यामुळे कारवाई केली जात नाही, असा आरोपही पटेल यांनी केला आहे.
या ‘स्केटिंग रिंक’चा सर्वांना लाभ व्हावा यासाठी बैसवारे यांच्याकडून ते काढून घेणे गरजेचे आहे, असेही पटेल म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया मिळवण्यासाठी कृष्णा बैसवारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर भाष्य करणे योग्य नाही.
या ‘स्केटिंग रिंक’मधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देखील उपलब्ध नसल्याचे महापालिका सांगत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.