नागपूर : मेट्रोनंतर आता नागपुरात लवकरच ट्रॉली बस सुरू होणार आहे. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली असून ती शहराच्या चार मार्गांना जोडणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी म्हणून गडकरींच्याच प्रयत्नातून नागपुरात सध्या मेट्रो धावत आहे. मात्र ती शहराच्या काही प्रमुख भागांनाच जोडते, शहरातील अनेक वस्त्या या मेट्रोच्या नेटवर्कमध्ये येत नाही. त्यांना मेट्रोसोबत जोडतानाच त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था म्हणून गडकरी यांनी ट्रॉली बस सेवेचा प्रस्ताव तयार केला आहे.
हेही वाचा – गडचिरोली : सुरजागड लोहखाणीत अपघात, अभियंत्यासह तिघे ठार
गोधनी येथील केंद्र सरकारच्या अमृत रेल्वे स्थानक विकास कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले या प्रकल्पासाठी राज्य सरकारने १५० कोटी रुपये दिले आहेत. यातून लवकरच बससाठी केबल लावण्याचे काम सुरू होईल. ही बस काटोल नाक्यापासून सुरू होईल. तेथून एमआईडीसी हिंगना टी-पॉइंट, तेथून वळण मार्गाने (रिंगरोडने) छत्रपती चौकात येईल. तेथून कळमना (पूर्व नागपूर) – कामठी रोड (उत्तर नागपूर) व तेथून छिंदवाडा मार्गाने काटोल नाक्यावर परत येईल. या बसमुळे ज्या भागात मेट्रो सेवा नाही तेथील नागरिकांना मेट्रोपर्यंत नेण्याची सोय होईल. डिझेलवर धावणाऱ्या सध्याच्या शहर बसच्या तुलनेत ट्रॉली बसचे भाडे ३० टक्के कमी असेल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.