नागपूर : मुंबई शहरात परप्रांतीयांची मुजोरी वाढत चालली आहे आणि याला महायुतीचे अभय आहे. हे सरकार मुंबईसह महाराष्ट्राचे गुजरातीकरण करत आहे का, असा प्रश्न शिवसेनेचे अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केला.
कल्याण पश्चिमेत एका सोसायटीमध्ये धूप लावण्याच्या मुद्द्यावरून शुक्ला आणि देशमुख या दोघांमध्ये वाद झाला. याचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात उमटले. अनिल परब यांनी या वादातील शुक्ला या व्यक्तीविरुद्ध प्रश्न उपस्थित केले आहेत.
मी मंत्रालयात काम करतो आणि सिएमओ कार्यालयातून एक फोन केला तर तुम्ही काही करू शकणार नाही. या मारहाणीनंतरही शुक्ला यांच्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. मुलुंड, गिरगाव येथेही मराठी महिलांबाबत जागेवरून अपमानित करण्यात आले. मुंबईचे, महाराष्ट्राचे गुजरातीकरण चालले का, हा सत्तेचा माज आहे का, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.
यावर सत्ताधारी पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठीचा अपमान सहन करणार नाही असे सांगत विरोधक घटनेचे राजकारण करत असल्याचे सांगितले.
महायुती कायम मराठी माणसांच्या पाठीशी उभी, पण महाआघाडी नाही. महाआघाडीने स्वतःची इभ्रत घालवली, असे म्हणताच भाई जगताप, सचिन अहिर, अनिल परब आदींनी सभापतींच्या आसनासमोर घोषणाबाजी सुरू केली. “मुंबई आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणा देत त्या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली.
माजोरड्यांचा माज उतरवणार – मुख्यमंत्री
विरोधकांनी या प्रकरणात घातलेल्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज काही वेळाकरिता स्थगित करण्यात आले. सभागृह सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आले. या प्रकरणात महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचा कर्मचारी असलेल्या अखिलेश शुक्ला याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्याचे सांगितले. त्याचे तात्काळ निलंबन करण्यात येत असून हे ३०७ चे प्रकरण असल्यास ३०७ देखील लावण्यात येईल आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसांचेच होते आणि राहील. त्यामुळे शुक्लसारख्या माजोरड्यांचा माज उतरवणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे याला राजकीय रंग देऊ नका. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि देशभरातील लोक तीन ते चार पिढ्यांपासून येथे आहेत. राष्ट्रीय अस्मिता तर जपलीच पाहिजे, पण क्षेत्रीय अस्मिता देखील महत्वाची आहे. आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि त्यावर कुणी आक्रमण करत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.