नागपूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी गुरुवारी केलेल्या निदर्शनांनंतर, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून शहा यांच्या समर्थानात आंदोलन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत ठिय्या दिला.
“आंबेडकरांचा विरोध हा काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे” आणि “संविधानविरोधी काँग्रेस हाय हाय” अशा घोषणांसह फलक हातात घेत काँग्रेसवर डॉ. आंबेडकर यांचे योगदान दुर्लक्षित केल्याचा आणि त्यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला.
हेही वाचा – अमरावती : वाहनाच्या धडकेत पुन्हा एका बिबट्याचा बळी
आंदोलनावेळी अमित शहा यांचे समर्थन करत काँग्रेसवर त्यांची विधाने मुद्दाम चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप केला. “शहा यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करून काँग्रेसने अनावश्यक वाद निर्माण केला आहे. अशा प्रकारचे राजकारण ही त्यांची खासियत आहे,” असे आंदोलक म्हणाले. तसेच, महायुती सरकार डॉ. आंबेडकर यांच्या वारशाचा सन्मान राखण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप नेत्यांनी काँग्रेसवर ढोंग केल्याचा आरोप केला आणि १९७५ च्या आणीबाणीच्या घटनेचा उल्लेख करून काँग्रेसने लोकशाही मूल्यांकडे केलेल्या दुर्लक्षावर टीका केली. “लोकशाही किंवा आंबेडकरांच्या वारशावर भाष्य करण्याचा काँग्रेसला कोणताही नैतिक अधिकार नाही,” असेही आंदोलक म्हणाले.
हेही वाचा – नरेंद्र मोदी आम्हाला वेळ देणार नाही, असे का म्हणाले रोहित पवार ?
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस “चुकीचे राजकारण” करत असल्याचा आरोप केला. “त्यांचे आंदोलन म्हणजे त्यांच्या अपयशांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीचा एक खटाटोप आहे. त्यांच्या असभ्य निदर्शनांमुळे आमचे खासदारही जखमी झाले आहेत,” असे त्यांनी सांगितले. आंदोलनात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये पंकजा मुंडे, प्रविण दटके, चंद्रकांत पाटील, मोहन मटे, आशिष देशमुख आदींचा समावेश होता.