नागपूर : नागपुरात थंडीचा जोर वाढू लागला असतानाच सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरणही तापले आहे. त्यातच फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तारही रविवारी नागपुरातच होणार असल्याने येता रविवार खऱ्या अर्थाने ‘हॉट’ ठरण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सामान्यपणे विरोधी पक्षाचे चहापान, मंत्रिमंडळाची बैठक आणि रात्री पत्रकार परिषद, विरोधी पक्षाची बैठक व पत्रकार परिषद, असे वेळापत्रक असते. यावेळी मात्र मंत्रिमंडळाचा विस्तारही नागपूरमध्येच होणार, असे सांगितले जात आहे. याला अधिकृतपणे दुजोरा मिळत नसला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नसल्याने आणि अधिवेशन तोंडावर असल्याने त्यापूर्वी विस्तार आवश्यक आहे. त्यामुळे शनिवारी याबाबत निर्णय न झाल्यास रविवारी नागपूरमध्येच विस्ताराचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, असे प्रशासकीय वर्तुळातून सांगितले जात आहे. नागपुरात शपथविधी झाला तर तो राजभवनावर होणार की विधानभवनासमोरील उद्यानात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राजभवनाच्या मोकळ्या व प्रशस्त जागेवर हा सोहोळा होईल, अशी शक्यता आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे नागपूरचे राजकीय तापमान वाढू लागले आहे.
हेही वाचा – चार वर्ष झाले पदमुक्त करा- नाना पटोले यांचे खरगे यांना पत्र
हेही वाचा – नागपूर: विद्यापीठाच्या ३६ परीक्षा पुढे ढकलल्या, कधी होणार बघा
s
विस्तारामुळे काय अडले?
विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मंत्र्यांचे ४० बंगले सार्वजनिक बांधकाम विभागाने सज्ज ठेवले आहेत. रामगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नामफलक लागले आहेत. इतर मंत्र्यांच्या बंगल्यावर अद्याप त्यांच्या नावाचे फलक लागले नाहीत, मंत्र्यांच्या दालनाचीही अशीच अवस्था आहे. पाट्या तयार आहेत, पण त्यावर नावे नाहीत. त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे.