नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. शहरात चौकाचौकात पोलीस तैनात आहेत. मात्र, गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपल्याचे चित्र आहे. पोलिसांचा ‘वसुली कार्यक्रम’ जोरात सुरु असून गुन्हेगार मात्र मोकाट आहेत. नंदनवन परिसरात सोमवारी रात्री आठ वाजता ग्राहक बनून एका युवकाने फोटो स्टुडिओच्या मालकाच्या कानशिलावर पिस्तूल ठेवली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोनसाखळी, अंगठी हिसकावून पळ काढला. भरवस्तीत रात्री आठ वाजता घडलेल्या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.

नरेंद्र गोतमारे (ओंकार अपार्टमेंट, नंदनवन) यांचा प्रसाद अपार्टमेंटमध्ये फोटो स्टुडिओ आहे. सोमवारी रात्री आठ वाजता एका युवक स्टुडिओमध्ये आला. त्याने फोटो काढायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे गोतमारे यांनी त्याला स्टुडिओमध्ये घेतले. त्याच्या हातात एक पिशवी होती. स्टुडिओमध्ये गेल्यानंतर त्या युवकाने ससीटीव्ही लावलेले आहेत का ? याचा अंदाज घेतला. फोटो काढण्यासाठी तयारी करीत असलेल्या गोतमारे यांनी त्या युवकाला बसायला सांगितले. तोच त्या युवकाने पिशवीतून पिस्तूल काढले आणि थेट गोतमारे यांच्या कानशिलावर ठेवले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसण्यास सांगितले. पिस्तूल रोखल्यामुळे गोतमारे घाबरले. त्यांनी आरडाओरड केली नाही. त्यानंतर त्या आरोपीने गोतमारे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी हिसकावली. बाहेर पडताना ओरडल्यास गोळी घालण्याची धमकी दिली आणि पळ काढला. घाबरलेल्या गोतमारे यांनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे कुटुंबीय धावतच स्टुडिओमध्ये आले. त्यांनी नंदनवन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटना सांगितली. सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नंदनवन पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. आमदाराच्या दबावानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज काढणे सुरु केले. या प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी ठाणेदार विनायक कोळी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – पवार गटाच्या आमदारांची अजितदादाशी भेट, मिटकरी म्हणाले “विरोधी बाकावर जीव रमत नसल्याने…”

हेही वाचा – भुजबळांचे मंत्रीपद अन् त्याचे नागपूर कनेक्शन

u

शेवटी आमदाराला करावा लागला फोन

गोतमारे हे नंदनवन पोलीस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत तक्रारदाराला आल्या पावली घरी पाठवले होते. मात्र, एवढी मोठी घटना घडल्यानंतरही नंदनवन पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्यामुळे त्यांनी एका आमदाराच्या कानावर ही घटना घातली. त्यामुळे त्या आमदाराने नंदनवनचे ठाणेदार विनायक कोळी यांना फोन केला. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader