दहावीत शिकत असलेल्या मुलावर नागपुरातील २४ वर्षीय तरुणीची ‘इंस्टाग्राम’वरून मैत्री झाली. तिने त्याला घरी बोलावले. त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असताना तिच्या आईला ते दोघे ‘नको त्या अवस्थेत’ दिसले. दोघांचीही पंचाईत झाली. मात्र, तरुणीच्या आईने मुलाविरुद्ध तक्रार देण्याची भूमिका घेतल्याने तरुणीच्या अल्पवयीन प्रियकराविरुद्ध पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलगा सुशांत हा उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरात राहतो. त्याने नागपुरात राहणारी २४ वर्षीय तरुणी रिया (काल्पनिक नाव) हिला ‘इंस्टाग्राम’वरून संदेश पाठवला. ओळख वाढली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेत चॅटिंग सुरू केली.
रियाने ‘एमबीए’ची पदवी घेतली आहे. सुशांतला रियाने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी नागपुरात भेटायला बोलावले. त्यासाठी तिने त्याला पैसेही दिले. सदर परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये नेवून सहमतीने दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ३० जूनला सुशांतला रियाने पुन्हा नागपुरात बोलावले व त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या दिवशी त्याला घरी नेण्याचे तिने ठरवले. तिचे वडिल नोकरीवर निघून गेले होते. तर आई नातेवाईकाकडे गेली होती. घरी कुणी नसल्याची संधी साधून तिने प्रियकर सुशांतला घरी नेले.
मात्र, तासाभरातच रियाची आई घरी परतली. तिच्या आईला दोघेही ‘नको त्या अवस्थेत’ दिसले. चिडलेल्या आईने त्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे रियाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी रियाच्या तक्रारीवरून सुशांतवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला व त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.