नागपूर : पतीचा अपघात झाला आणि तो पलंगाला खिळला. त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती बिघडली. दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च, सासू-सासऱ्यांचे आजारपण आणि पतीचा उपचाराचा खर्च न झेपावल्यामुळे ती चक्क देहव्यसायाच्या दलदलीत ओढल्या गेली. मात्र, काही महिन्यानंतर याची पतीला कुणकुण लागली. त्यामुळे संसार तुटण्याच्या काठावर आला. मात्र, भरोसा सेलने पत्नीला देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर काढले तर पतीची समजूत घातली. अशाप्रकारे दोघांच्याही संसाराची गाडी पुन्हा रुळावर आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात राहणारे संजय आणि मनिषा (काल्पनिक नाव) हे दाम्पत्य दोन मुली आणि वृद्ध आईवडिलांसह राहतात. घरातील एकमेव कमावता असलेला संजय खासगी नोकरी करतो. कार्यालयात जात असताना संजयचा मोठा अपघात झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचारावर खूप खर्च झाला. त्यामुळे जमवलेली रक्कम उपचारावर खर्च झाली. कमावती व्यक्ती पलंगाला खिळल्यामुळे घरातील आर्थिक स्थिती बिघडली. दोन्ही मुलींच्या शिक्षणाचे शुल्क रखडले तर वृद्ध सासू-सासऱ्यांच्या आजारपणाचाही प्रश्न निर्माण झाला. नातेवाईकांनीही हात झटकले. पतीच्या औषधाचीसुद्धा सोय नव्हती. कर्जाचा डोंगर बघता मनिषाने स्वतः घराबाहेर पडून संसाराचा गाडा हाकण्याचे ठरविले. ती एका रुग्णालयात साफसफाईच्या कामाला जायला लागली. मजुरीचे जेमतेम पैसे यायला लागले. मुलींच्या शिकवण्या बंद कराव्या लागल्या तर काटकसर करुन कसेबसे भागत होते.

हेही वाचा – ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?

नाईलाजास्तव देहव्यापाराचा रस्ता

रुग्णालयातील कर्मचारी महिलेने मनिषाची बेताची परिस्थिती ओळखली आणि देहव्यापारात झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवले. मनाची तयारी नसतानाही नाईलाजास्तव ती देहव्यवसायाच्या दलदलीत उतरली. ती काही दलालांच्या जाळ्यात अडकली आणि आंबटशौकीन ग्राहकांच्या सेवेसाठी जायला लागली. काही महिन्यात घरची स्थिती सुधारली. पतीची प्रकृती चांगली झाली. तो पुन्हा नोकरी करायला लागला. त्यामुळे मनिषाने देहव्यावसाय सोडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – अमरावती विद्यापीठात मुलींची संख्‍या अधिक; काय आहे ‘जेंडर ऑडिट’मध्ये ?

पतीला लागली कुणकुण आणि संसाराला तडा

संसार पुन्हा रुळावर आल्यामुळे मनिषाने हळूहळू देहव्यापार सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिला दलालाला तिचा निर्णय मान्य नव्हता. तिने मनिषाच्या पतीपर्यंत माहिती पोहचवली. त्यामुळे घरात वाद झाले. तिने घरातील आर्थिक स्थिती बघता नाईलाजाने देहव्यापार केल्याचे मान्य केले. त्यानंतर ती काही दिवसांसाठी माहेरी गेली. हे प्रकरण भरोसा सेलपर्यंत पोहोचले. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे आणि समूपदेशक जयमाला बारंगे यांनी पती-पत्नीचे समूपदेशन केले. पतीनेही दोन्ही मुलींचे भविष्य आणि पत्नीने कुटुंब सावरण्यासाठीच उचललेल्या निर्णयाला समजून घेतले. पोलिसांच्या समन्वयाने त्यांचा संसार पुन्हा फुलला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur women enter in prostitution after financial condition dropped husband upset police help family adk 83 ssb