अनिल कांबळे, नागपूर : पतीच्या निधनानंतर दोन मुलांची आई असलेल्या महिलेचे नागपूरच्या एका युवकाशी सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध अधिक घट्ट झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. युवकाच्या आईवडिलांनीही होकार दिल्याने तिने दोन्ही मुलांना वाऱ्यावर सोडून प्रियकराची साथ देण्याचा निर्णय घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर दोन्ही लेकरांना सोडून प्रियकरासोबत पळ काढला. मात्र, काही दिवसांतच तिच्या सासरच्यांना आपली सून दोन मुलांची आई असल्याचे कळले. त्यांनी तिला घराबाहेर काढले. प्रियकरासाठी मुलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रेयसीला आता मुलांची आठवण आली असून ती पोलिसांच्या मदतीने मुलांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल असा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.
हेही वाचा >>> पाऊले चालती पंढरीची वाट…‘श्रीं’च्या पालखीचे संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रिया (बदललेले नाव) ही मूळची उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी आहे. तिच्या पतीचे एका वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ती तीन आणि दोन वर्षांच्या मुलींसह इमारतीच्या बांधकामावर काम करीत होती. तेथे नागपुरातील एक युवक विजय (बदललेले नाव) मजुरी करीत होता. काम करताना तो एकट्या असलेल्या प्रियाला मदत करीत होता. दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांचे सूत जुळले. काम संपल्यानंतर विजय नागपूरला परत आला. त्यानंतरही प्रिया आणि विजय दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
हेही वाचा >>> ओबीसी खात्याला ‘आयएएस’ अधिकाऱ्याचे ‘वावडे’! – गैर सनदी अधिकाऱ्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार
त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विजयने आईवडिलांशी चर्चा करून लग्नास होकार मिळविला. मात्र, दोन्ही मुलांबाबत विचार करण्यास सांगितले. आईवडील मुलांना स्वीकारणार नाहीत, अशी पूर्वकल्पना त्याने प्रियाला दिली. प्रियाने प्रेमासाठी मुलांना सोडण्याचा निर्णय घेतला. पण सासरी सांगता येत नाही आणि माहेरकडील लोक मुलांना ठेवणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर प्रिया अडचणीत आली. तिने हृदयावर दगड ठेवून मुलांना वाऱ्यावर सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>> शासकीय निवासी शाळांमधील ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाची घोषणा कागदावरच ; नवीन शैक्षणिक सत्राच्या तोंडावरही अंमलबजावणी नाही
मुलांना सोडले रेल्वेस्थानकावर
प्रिया दोन्ही मुलांना घेऊन ३१ मे रोजी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. तिने दोन्ही मुलांना रेल्वेस्थानकावर सोडून प्रियकरासोबत पळ काढला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेत चाईल्ड लाईनच्या सदस्यांना पाचारण केले. त्यानंतर मुलांना श्रद्धानंदपेठमधील खासगी बालगृहाला सोपवण्यात आले. सध्या ही दोन्ही मुले या बालगृहातच आहेत.
हेही वाचा >>> महामार्गावर पादचाऱ्यांचे अधिक मृत्यू ; दोन वर्षांत देशभरात १५ हजार बळी
सासरच्यांनी घराबाहेर हाकलले
मुलांना वाऱ्यावर सोडून प्रियाने विजयशी संसार थाटला. मात्र, लग्नाच्या काही दिवसांतच सासू-सासऱ्यांना आपली सून दोन मुलांची आई असल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी तिच्याशी भांडण केले आणि तिला घराबाहेर काढले. त्यावेळी विजयनेही आईवडिलांचा विरोध केला नाही.
हेही वाचा >>> विवाहित महिलेसोबतचे प्रेमसबंध जिवावर बेतले, पहिल्या प्रियकराकडून युवकाची हत्या
सासरच्यांनी घाराबाहेर काढल्यानंतर मुलांची आठवण
दरम्यान, प्रियकरानेही साथ सोडल्यामुळे प्रियाला आपल्या दोन्ही मुलांची आठवण आली आहे. सध्या या महिलेची स्थिती प्रियकरही गेला आणि मुलेही गमावली अशी झाल आहे. अशा स्थितीत ती पुन्हा रेल्वे स्थानकावर पोहचली. तिने रेल्वे पोलिसांना भेटून मुलांबाबत विचारणा केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले. प्रियानेच मुलांना सोडल्याचे लक्षात आले. आता मुले मिळविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.