नागपूर : सुट-बूट घालून एक युवक कारने वस्तीत येत होता. हातात लाखभर किंमतीचा भ्रमणध्वनी घेऊन वस्तीतील लग्न घर हेरायचा. कार उभी करुन लग्नघरातील दागिने, सामान आणि दागिन्यांवर हात साफ करायचा. चोरीच्या पैशांवर मौजमजा करायचा. पैसे संपल्यानंतर पुन्हा अशाचप्रकारे चोरी करायला निघायचा. अशा ‘हायफाय’ असलेल्या चोरट्याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तब्बल शंभर सीसीटीव्ही फुटेज तपासले. लाईव्ह लोकेशन मिळवून मध्यप्रदेशातील भोपाळ शहरातून सिनेस्टाईल त्याच्या मुसक्या आवळल्या. रजणिकांत चानोरे (२४) रा. भंडारा असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोपी रजणिकांत हा अशिक्षित आहे. त्याला दोन भाऊ आहेत. आई वडील शेतकरी असून शेतमजुरी करतात. त्यामुळे रजनीकांतला दारिद्र्यात जीवन जगायला लागले. त्त्याने चोरी हा पर्याय निवडला. त्याला भौतिक सुख सुविधांची चटक लागली. चोरी करण्यापूर्वी तो संबंधित परिसरात महागडा फ्लॅट किरायाने घेतो. आठवडाभर घराची टेहळणी करतो. दर वेळी वेगवेगळी शक्कल लढवितो. परिसरात चोरी केल्यानंतर पुन्हा तिकडे फिरकत नाही. बोभाटा झाला की तो चोरीसाठी दुसऱ्या शहरात जातो. विशेष म्हणजे चोरी करतेवेळी मोबाईलचा वापर करीत नाही. चोरीच्या पैशातून त्याने कार घेतली. एक लाख रुपये किंमतीचा मोबाईल विकत घेतला. त्याचा एक जिन्स पाच हजार रुपयाचा आहे. त्याची टी-शर्ट तीन हजाराच्या खाली नाही. ऑनलाईन जुगार, जीम आणि त्यासाठी महागडे प्रोटीन पावडर यावर तो पैसे खर्च करतो. हुडकेश्वर येथील रहिवासी सुरेश सरोदे (६३) यांच्या मुलीचे २४ डिसेंबर २०२४ ला लग्न होते. आरोपीने घरफोडी करून एक लाख ३ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरले. या घटनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी केला.
घरफोडीचे वीस गुन्हे दाखल
आरोपीवर छत्तीसगढ राज्यात तीन गुन्ह्याची नोंद आहे. तसेच चंद्रपुरात तीन, भंडारा येथे ९ घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. त्याने हुडकेश्वर हद्दीत पाच घरफोड्या केल्या. त्याच्या ताब्यातून १० लाख रुपये किंमतीचे १३० ग्रॅम सोने, एक कार, दुचाकी, मोबाईल, असा एकूण १७ लाख ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रेयसीवर उडवतो पैसे
चोरी केल्यानंतर तो थेट प्रेयसीला फिरायला घेऊन जातो. तिला महागडे कपडे, मोबाईल, शूज आणि अन्य साहित्य घेऊन देतो. तिला व्यवसाय असल्याचे सांगितले असून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आहे. मात्र, ती लग्न करण्यासाठी तयार नसून फक्त त्याच्या पैशावर पार्टी आणि मौजमजा करते, अशी माहिती समोर आली.