नागपूर : कॅनडामध्ये वाहनचालकाची नोकरी करण्यासाठी अवैधमार्गाने गेलेल्या नागपुरातील एका युवकाचे मॅक्सिकोतून गुन्हेगारांनी अपहरण केले. या युवकाचा पैशांसाठी अतोनात छळ केला. त्याच्याकडून ५० लाख रुपये उकळले. सलग तीन दिवस पायी चालवल्यानंतर अमेरिका सीमेवर सोडून दिले. अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरणाचा गुन्हा दाखल करून त्याला भारतात परत पाठवले. हा युवक गुरुवारी सकाळी नागपुरात पोहचला. त्याने चौकशीदरम्यान जी प्रवासकथा सांगितली ती अंगावर काटा उभा करणारी आहे. हरप्रीत सिंग लालिया (३३, बाबा बुद्धाजीनगर, पाचपावली) असे या युवकाचे नाव आहे.
अमेरिकेतून १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना लष्कराच्या विमानाने भारतात परत पाठवण्यात आले. यात महाराष्ट्रातील तीन युवकांचा समावेश आहे. यातील हरप्रीतसिंग लालिया (३३) हा नागपूरचा आहे. तो नागपुरात पोहोचताच त्याला पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाणेदार बाबुराव राऊत यांनी त्याची चौकशी केली असता हरप्रीतने त्याची छळकथा सांगितली.
तो म्हणाला, कॅनडात वाहनचालकाला चार लाख रुपये वेतन मिळत असल्यामुळे मला तेथे नोकरी करायची होती. त्यामुळे एक ट्रक विकला आणि आलेल्या पैशातून कॅनडाला जाण्याची तयारी केली. व्हिजा आणि पासपोर्ट काढले. ५ डिसेंबर २०२४ ला दिल्लीवरून सौदी अरेबीयाला पोहचलो. तेथील अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी परवानगी नसल्याचे सांगून दिल्लीला परत पाठवले. नंतर पंजाबमधील गुरुदासपूर येथे नातेवाईकाच्या माध्यमातून त्याची एका दलालाशी भेट झाली. त्याने १८ लाख रुपये दिल्यास थेट कॅनडात नेण्याची हमी दिली. त्यामुळे त्याला १८ लाख रुपये दिले.
दलालाने पैसे घेऊन कैरो-इजिप्तला पाठवले. तेथे अन्य १५० जण होते. त्यांनाही कॅनडाला जायचे होते. तेथे चार दिवस थांबवल्यानंतर माँटेरियाल येथे नेण्यात आले. तेथून लगेच स्पेनमध्ये नेण्यात आले. चार दिवस पुन्हा थांबल्यानंतर ग्वॉटेमॉलाला नेले. तेथून निकारागुवा आणि हाँडरस या देशातून मॅक्सिकोमध्ये नेण्यात आले. मॅक्सिकोजवळील टेकॉयटन सीमेवर थांबवण्यात आले. तेथे पोलिसांनी पकडले आणि तेथील गुन्हेगारांच्या ताब्यात दिले. त्यांनी अपहरण करून एका जंगलात नेले. तेथे सर्वांना लाखोंची खंडणी मागण्यात आली, अशी माहिती हरप्रीतने प्रसारमाध्यमांना दिली.
प्यायला पाणी नाही, शौचास मनाई
अपहरणकर्त्यांनी बंदुकीच्या धाकावर विविध देशातील दीडशे लोकांना पकडले होते. एका नेपाळी युवकाने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याला गोळी घालून ठार करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी पैसे जमवण्यास सुरुवात केली. यादरम्यान, अपहरणकर्त्यांनी आम्हाला जबर मारहाण केली. सर्वांना उपाशी ठेवले. पाणी पिण्यास आणि शौचास जाण्यास मनाई केली. यादरम्यान, हरप्रीतनेही भारतातील कुटुंबीय आणि नातेवाईकांशी संपर्क साधून जवळपास ५० लाख रुपये गोळा केले व ते अपहरणकर्त्यांना दिले. सर्वांना सलग तीन दिवस डोंगर-दऱ्यातून पायी चालवण्यात आले व नंतर साऊथ अमेरिकेच्या सीमेवर सोडून दिले. तेथून अमेरिका पोलिसांनी बंदी बनवले. कारागृहात डांबले. कसून चौकशी करून कैद्याप्रमाणे वागणूक दिली. हातकडी, कंबरेत साखळी आणि पायही बांधून ठेवण्यात आले. विमानातसुद्धा आम्ही अशाच स्थितीत होतो, अशी माहिती हरप्रीतने दिली.