नागपूर : माफियांच्या तावडीतून सुटल्यानंतर अमेरिकेच्या सीमेवर देशविदेशातील दीडशे जणांनी सैनिकांच्या भीतीपोटी आत्मसमर्पण केले. सैनिकांच्या हातूनसुद्धा मारले जाणार अशी सर्वांना कल्पना होती. अशा स्थितीत नागपूर युवकाने अमेरिकन सैनिकांशी संवाद साधून सत्य मांडत दीडशे जणांचे प्राण वाचवले. पाचपावलीतील बाबा बुद्धाजीनगरात राहणाऱ्या हरप्रीत सिंग लालिया या युवकाने पंजाबच्या दलालाच्या नादी लागून अवैध मार्गाने कॅनडात जाण्याचा प्रयत्न केला होता. कॅनडात गेल्यावर दोन लाख रुपये महिन्याने वाहन चालक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष हरप्रीतला दलालांनी दिले होते. त्यासाठी त्याने १८ लाख रुपये दलालांना दिले होते. दलालांनी त्याच्यासह १५० जणांना कैरो-इजिप्तला पाठवले.
तेथून चार दिवसांनंतर मॉंटेरियाल येथे नेण्यात आले. तेथून लगेच स्पेनमध्ये नेण्यात आले. चार दिवस पुन्हा थांबल्यानंतर ग्वॉटेमॉला हॉंडरस आणि निकारागुव्हा या देशात नेले. या देशातून मॅक्सिकोमध्ये नेण्यात आले. मॅक्सिकोजवळील टेकॉयटन सीमेवर मेक्सिको पोलिसांनी त्यांनी पकडले आणि माफियांच्या ताब्यात दिले. माफियांनी त्यांचा अतोनात छळ केला. उपाशी ठेवणे, शौचास मनाई करणे, चिकन खाण्यास भाग पाडणे आणि घाणेरडे पाणी पिण्यास देण्यासह अन्य विविध प्रकारचा छळ केला. अपहृत १५० जणांच्या कुटुंबियांकडून माफियांनी खंडणी वसूल केल्यानंतर साऊथ अमेरिकेच्या सिमेवर सोडून पळ काढला. हरप्रीतने पाचपावली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माफियांचा छळ सहन केल्यानंतर आता अमेरिकन सैनिकांच्या गोळीबारात मारले जाणार अशी सर्वांना कल्पना होती. मात्र, नागपूरकर हरप्रीत याने सर्वांना धीर दिला. अमेरिकेच्या सीमेवर ‘ड्रोन’ हल्ल्यात मारल्या जाण्याची भीती असली तरी हात वर करुन एकाच जागी थांबण्याची सूचना हरप्रीतने सर्वांना केली. त्याच्या सूचनेला सर्वांनी सहमती दर्शवली. सर्व जण हात वर करुन उभे राहिले. हरप्रीत नागपुरात पोहचल्यानंतर पाचपावली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पाचपावली पोलीस ठाण्यात बोलावले. त्याची सविस्तर चौकशी केली. त्याने चौकशीदरम्यान त्याच्यासोबत घडलेला थरारक अनुभव पोलिसांकडे कथन केला. अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवातून हरप्रीत गेल्यानंतर त्याने दलालांनी उकळलेले पैसे परत मागितले आहेत. तसेच कुठेतरी नोकरी शोधण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे.
अमेरिकन सैन्याने घेरले
जवळपास २० मिनिटांनंतर अमेरिकन पोलिसांच्या नजरेस आम्ही सर्व जण पडलो. उर्वरित आयुष्य आता अमेरिकेच्या कारागृहात कंठावे लागेल किंवा दहशतादी किंवा हेर असल्याचा आरोप करुन गोळ्या झाडून जीव जाणार असे सर्वांना वाटत होते. हरप्रीत आणि अन्य एका तरुणाने अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला. त्यांना सत्यता सांगितली. त्यामुळे त्यांनी सर्वांना हातकड्या घालून कारागृहात नेले. सत्य पटल्यानंतर त्यांनी भारतीय दुतावासाशी संपर्क करुन भारतात परत पाठविण्याची प्रक्रिया केल्याची माहिती हरप्रीतने पोलिसांना दिली.