नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज, सोमवारी निवडणूक होत आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांता कुमरे, मुक्ता कैकाडे व देवानंद कोहळे यांची तर उपाध्यक्षपदासाठी सुमित्रा कुंभारे, मनोहर सव्वालाखे यांची नावे चर्चेत आहेत. सोमवारी सकाळी यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. दरम्यान, सत्ताधारी काँग्रेसकडे बहुमत असले तरी एक गट नाराज असल्याने पक्षात धाकधूक आहे.
५८ सदस्यीय जिल्हा परिषदेत ३३ सदस्यीय काँग्रेसकडे बहुमत आहे. १४ जागा भाजपकडे तर ८ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेसनेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटाचे जि.प. वर वर्चस्व असून सध्या त्यांच्या गटाच्या रश्मी बर्वे या अध्यक्ष आहेत, नवा अध्यक्ष ठरवताना केदार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
पहिले अडीच वर्ष अध्यक्षपद केदार गटाला देण्यात आल्याने उर्वरित काळासाठी ते इतरांना द्यावे, अशी काँग्रेसमधील केदार विरोधी गटाची मागणी आहे. यातूनच पक्षातील नाना कंभालेंनी वेगळी चूल मांडली. त्यांच्याकडे तीन सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसकडे असलेले ३३ सदस्यांचे संख्याबळ लक्षात घेता नाराज सदस्यांनी वेगळी भूमिका घेतली तरी याचा काँग्रेसच्या विजयावर परिणामाची शक्यता नाही.
नाराज सदस्यांची समजूत घालण्यात आली असल्याचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सांगितले आहे, तरी कंभाले यांनी मात्र ते नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती केली असून ते प्रत्येक सदस्यांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवणार असल्याचे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले.
दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसच्या ३२ सदस्यांची व्यवस्था कळमेश्वरमधील एका फार्महाऊसवर करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत शेकापचा एक व राष्ट्रवादीचे दोन सदस्य आहेत. सोमवारी निवडणुकीसाठी हे सदस्य तेथून थेट जिल्हा परिषदेत येणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १ अर्ज भरण्याची वेळ आहे. भाजपकडे संख्याबळ नाही, त्यामुळे निवडणूक रिंगणात आम्ही उतरणार नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.