नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात एका दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आली. मुलं होत नसल्यामुळे दाम्पत्याने जीवनयात्रा संपविल्याचे कारण समोर आले आहे. या घटनेमुळे जरीपटका परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप (५४) आणि पत्नी अॅनी जारील मॉनक्रिप (४५) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टोनी आणि अॅनी यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचाही सुखी संसार सुरु होता. परंतु, त्यांना मुलं होत नव्हती. त्यामुळे आयुष्यात नैराश्य आले होते. दोघेही खचलेल्या मनाने एकमेकांना सांभाळून घेत संसार करीत होते. करोनानंतर टोनीच्या हातचे काम सुटले. तेव्हापासून टोनी नैराश्यात गेला. गेल्या दोन वर्षापासून टोनीच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे दोघेही पती-पत्नी उदास राहत होते. मुलं नसल्यामुळे आता जीवनाला काय अर्थ आहे? असा प्रश्न त्यांना नेहमी पडत होता. मात्र, नातेवाईक त्यांची समजूत घालून दोघांचेही मन सांभाळत होते. परंतु, टोनी आणि अॅनी यांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून ते आत्महत्या करण्याच्या विचारात होते. दोघांनीही लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्या करण्याचे ठरविले. नातेवाईकांसह ख्रिसमस साजरा केल्यानंतर दोघेही निराश राहत होते. ६ जानेवारीला त्यांना आत्महत्या करायची होती. त्यामुळे सोमवारी दोघांनीही सकाळपासून जेवनसुद्धा केलेे नव्हते.
हेही वाचा…मंत्रीच म्हणतात “वाळू धोरणात सुधारणा केल्या तरी माफिया नियम मोडतातच”
दोघांनीही घेतला गळफास
टोनी आणि अॅनी यांनी सोमवारी रात्री नातेवाईकांना फोन केला. विचारपूस केली आणि सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवले. मध्यरात्रीनंतर पती-पत्नीने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी १० वाजले तरी टोनी आणि अॅनी झोपेतून उठली नसल्यामुळे शेजाऱ्यांनी चिंता पडली. त्यामुळे एका महिला शेजाऱ्याने त्यांना आवाज दिला. मात्र, दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्या महिलेने खिडकीतून डोकावून बघितले असता पती-पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तिने लगेच अन्य शेजाऱ्यांना माहिती दिली. एकाने जरीपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.