नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिले खासगी चालक प्रशिक्षण केंद्र (डीटीसी दर्जा) नागपुरात तयार झाले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (१९ एप्रिल) झाले. या केंद्रामुळे वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी आरटीओत पायपीट करण्याची गरज उरणार नाही.केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यताप्राप्त एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड, सावरमेंढा, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर येथील केंद्रासाठी खासगी तत्वावर संपूर्ण खर्च करण्यात आला आहे. डीटीसी दर्जाचे हे प्रशिक्षण केंद्र देशातील पहिले आहे. या केंद्रात दुचाकीपासून जड वाहनापर्यंत सर्व वाहने चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उमेदवाराला प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतर या प्रशिक्षण केंद्रातच विविध चाचण्या होतील. चाचणीचा अर्ज संबंधित केंद्र चालकाकडून तेथील आरटीओ कार्यालयात जमा केला जाईल. त्यानंतर उमेदवाराला वाहन चालवण्याचा परवाना मिळेल. त्यामुळे आरटीओ कार्यालयात पायपीट करण्याची गरज उरणार नाही. राज्यात सध्या तीन जिल्ह्यात चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (आयडीटीआर) संस्था कार्यरत आहेत. त्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली गेली आहे. परंतु सरकारची मदत न घेता स्वत:च्या खर्चावर डीटीसी दर्जाचे चालक प्रशिक्षण केंद्र सुरू होणारे नागपुरातील एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड हे देशातील पहिले केंद्र आहे. येत्या काळात येथे स्वयंचलीत पद्धतीने कायम वाहन परवान्याच्या तपासणीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या वृत्ताला नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाने दुजोरा दिला.
एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेडचे म्हणणे काय?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघात नियंत्रणासाठी देशभरात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचे (डीटीसी दर्जा) धोरण आणले. त्यानुसार नागपुरात देशातील पहिले खासगी केंद्र सुरू होत असल्याची माहिती , एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनिष वझलवार यांनी दिली.
केंद्र सरकार १५ हजार चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार- नितीन गडकरी
देशात २२ लाख प्रशिक्षित चालकांचा अभाव आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून १५ हजार चालक प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. सावनेर तालुक्यातील सावरमेंढा येथे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल प्रायव्हेट लिमिटेड चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, मागील दहा वर्षात राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती, अपघात व महामार्ग वाढल्याने या पद्धतीच्या केंद्राची देशाला गरज आहे. आशीष देशमुख यांनी या पद्धतीच्या देशातील पहिल्या केंद्रामुळे आता वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी आरटीओत जाण्याची गरज पडणार नसल्याचे सांगितले. विवेक भीमनवार म्हणाले, येथून चांगले चालक तयार होतील