नागपूर : वाघांनी अनेकदा पर्यटकांची वाट अडवली आहे, पण अस्वलही त्याच वाटेवर जात असेल तर.. नागझिरा अभयारण्यात हे घडले आहे आणि पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. नागझिरा अभयारण्य आणि अस्वलाचा उल्लेख होणार नाही असे शक्यच नाही. या अभयारण्याची ती ओळख आहे. कधी तो वारुळ पोखरुन त्यातील अळ्या खातो, तर कधी पावसाळ्यासाठी तयार करुन ठेवलेली मधाची पोळी या वारुळात लपवून ठेवतो आणि खातो.
अस्वल आणि तेही सहकुटूंब या अभयारण्यात ज्या पर्यटकाला दिसले तो नशीबवान! या अभयारण्यातल्या अस्वलाच्या अनेक कथा आहेत. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकात अस्वलाचे अनेक किस्से सांगितले आहेत. दोन दिवसांपूर्वी पर्यटकांची वाहने या अभयारण्यातून जात असताना हे अस्वल रस्त्याच्या मधोमध फेरफटका मारायला लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने जंगलात जाण्यासाठी त्याला वाट मोकळी होती.
VIDEO >>>
हेही वाचा >>> भंडारा : नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील वाघांना उद्या दोन नव्या ‘मैत्रिणी’ भेटणार!
पर्यटकांची वाहनेही बऱ्याच अंतरावर होती. तरीही तो पर्यटनाच्या रस्त्यावरच चालत होता. त्याला जणू हेच सांगायचे होते की हा रस्ता तुमचा नाही तर हा माझ्या अधिवासातला रस्ता आहे. त्यामुळे त्यावर आधी मीच त्यावरुन जाणार आणि मग तुम्ही. बराचवेळानंतर त्या अस्वलाने आत जंगलातली वाट पकडली आणि त्याच्यासाठी मागेपुढे होणारी पर्यटकांची वाहने मार्गी लागली.