बुलढाणा : जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात केसगळती व टक्कल आजाराची दहशत कायम आहे. चार महिन्यांनंतरही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा (आयसीएमआर) अहवाल लालफीतशाहीतच अडकला आहे. यामुळे बाधित गावे आणि रुग्णांतील भीती कायम आहे.या पाठोपाठ शेगाव तालुक्यात आता नखगळतीचे संकट उभे ठाकले आहे. ग्रामस्थांची नखें कमकुवत होऊन गळून पडत आहे. बाधित गावांत जिल्हा आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षणवजा पाहणी करण्यात येत आहे. काल रविवार, २० एप्रिलअखेर रुग्णसंख्या ६० च्या घरात पोहोचली आहे. पहिल्या दिवशी १७ एप्रिलला रोजी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंती शेगाव तालुक्यातील चार गावात नखगळतीचे तब्बल ३७ रुग्ण आढळून आले होते. यातील बव्हंशी रुग्ण हे केसगळती व टक्कलचे रुग्ण असल्याचे आढळून आले.

१८ तारखेला आरोग्य यंत्रणांनी केलेल्या पाहणीत नखगळतीचे आणखी तीन रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे रुग्णसंख्या 40 वर गेली. १९ ला देखील सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पाहणीत आणखी १४ रुग्ण आढळून आले. २० तारखेला आणखी ३ रुग्ण आढळल्याने नखगळतीची रुग्णसंख्या ६० च्या घरात गेली आहे. शेगावमधील कठोरा, मच्छिन्द्रखेड, बोन्डगाव, घुई, कालवड या गावात नखगळतीची तीव्रता जास्त आहे. यात वाढच होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेगाव, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील टक्कल बाधित सोळाएक गावात आता नखगळतीच्या विचित्र आजाराची भीती पसरली आहे.

संयुक्त संचालकांची भेट

आज सोमवारी पुणे येथील विशेष आरोग्य चमू शेगाव तालुक्यात दाखल झाली. बोंडगाव, कठोरा या गावांना चमुने भेट दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्त संचालक ( जॉईंट डायरेक्टर) डॉ. बबिता कमलापूरकर यांनी आज बाधित रुग्णांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. सोबत आरोग्य विभागाचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी होते.

बोंडगावसह परिसरातील गावात सुरुवातीला केसगळती आणि आता नागरिकांच्या नखगळतीने खळबळ उडाली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबविता आलेले नाही. आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईन्ट डायरेक्टर डॉ. बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली. यावेळी नखगळती झालेल्या बाधित रुग्णांशी त्यांनी चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे तीन महिन्यांपूर्वी केसगळतीमुळे हे गाव प्रकाशझोतात आले होते. दरम्यान, दिल्ली येथील आयसीएमआरच्या पथकाने या गावात पोहोचून केस, नख, अन्नधान्य, पाणी रक्तांचे नमुने घेतले होते. मात्र त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आचार्य व्यक्त होत असतानाच आता नख गळतीचे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खळबळून जागे झाले आहे. नखगळतीबाबत तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. उद्या मंगळवारी गावांमध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहेत. गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही. लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती डॉ. बबीता कमलापूरकर यांनी दिली.