नावात काय आहे, असं शेक्सपीअरने म्हटलेलं असलं, तरी नावातच सर्व काही आहे, याचा प्रत्यय दैनंदिन जीवनात येतच असतो. नावात काय आहे याऐवजी नावात काय नाही, असा प्रश्न खरं तर विचारला पाहिजे. भंडारा जिल्ह्यातील एक लहानसे गाव शेक्सपीअरच्या या मताला छेद देणारे ठरत आहे.
शाळेत असताना विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची एकसारखी आडनावं आपण ऐकली असेलच. त्यावरून शाळेत अनेकदा हजेरीचा गोंधळ उडाल्याचेही आपण पाहिला असेलच. पण, गावातील सर्वच ग्रामस्थांचे आडनाव सारखेच, नुसते आडनावच काय तर त्यांची जात आणि व्यवसायही सारखाच असेल तर? हो, ही काही एखाद्या सिनेमाची स्टोरी नाही, तर भंडारा जिल्ह्यातील पन्नाशी गावाची खरीखुरी कहाणी आहे.
हेही वाचा- …तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी जंगलव्याप्त भागात वसलेलं पन्नाशी हे गाव. गावाच्या नावाप्रमाणेच या गावात पन्नासच घरं आणि सर्व ग्रामस्थांचे एकच आडनाव. असं कसं, असा प्रश्न आपणास पडला असेल. पण हे सत्य आहे. या गावातील सर्वच ग्रामस्थांचे आडनाव शेंडे आहे. त्यांची जातही एकच आहे आणि व्यवसायही सारखाच म्हणजे शेती.
हेही वाचा- नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांना ‘तो’ कायदा ठरणार अडचणीचा…
दीडशे वर्षापूर्वी या गावात एक कोसरे माळी समाजाचे शेंडे कुटुंबीय राहण्यासाठी आले. त्यांनी हळूहळू आधी फुलशेती फुलवली आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही येथे वास्तव्यास आले. त्यामुळे आजमितीस या गावात शेंडे आडनावाचे ५० कुटुंब राहतात. गावातील सर्वच शेंडे कुटुंबीय भाजीपाला शेतीसह फुलशेतीकडे वळले आहे. येथील भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द आहे. गावातील सर्वजण गुण्यागोविदाने नांदतात. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. सण उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम एकत्रित येत मोठ्या उत्साहात साजरे करतात.
हेही वाचा- नागपूर : म्हाडाच्या जागेवर खासगी सोसायटीचे भूखंड
नागरिकांच्या सांगण्यानुसार गावात कधीही भांडण-तंटे झाले नाही. देशभरात करोनाची लाट असताना या गावातील नागरिकांनी करोनाला आपल्या गावातील वेशीपर्यतसुद्धा येऊ दिले नाही. राज्यातील प्रत्येक गावातील नागरिक पन्नाशी या छोट्याशा गावातील नागरिकांप्रमाणे गुण्यागोविंदाने, भांडण-तंटे न करता राहिले तर पोलिसांचा ताण नक्कीच कमी होईल. या अजब गावाची गजब कथा जिल्हावासियांसाठी नवी नसली तरी इतरांसाठी मात्र कुतुहलाचा विषय ठरत आहे.