बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील उंद्री गावाचे नाव नुकतेच बदलण्यात आले. आता उंद्री हे गाव उदयनगर या नावाने ओळखले जाणार आहे. ‘उंद्री’ शब्दामुळे गावाचे नाव सांगण्यात ग्रामस्थांना संकोच वाटत होता. त्यामुळे नामांतरणासाठी ५० वर्षांचा मोठा लढा द्यावा लागल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. दीर्घ कालावधीनंतर का होईना, आता गावाचे नामांतरण झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात वणव्यांच्या प्रमाणात वाढ; महाराष्ट्रात यावर्षी २४ हजार ५९२ घटनांची नोंद
औरंगाबाद, उल्हासनगर, अहमदनगर आदी जिल्ह्यांच्या नामांतरणावरून सध्या राज्यातील राजकारण रंगले आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सर्व घडामोडीतच बुलढाणा जिल्ह्यातील एका गावाचे नामांतरण करण्यात आले. त्यामागे मोठी पार्श्वभूमी आहे.
हेही वाचा >>> संतापजनक! अमरावतीमध्ये शेतकऱ्याला मारहाण, खायला लावली मानवी विष्ठा
सर्वधर्मसमभाव जपणारे उंद्री गाव खामगाव-जालना मार्गावर वसले असून गावची लोकसंख्या ८ हजारांच्या घरात आहे. उंद्री या गावाच्या नावामुळे ग्रामस्थांच्या मनात संकोचाची भावना होती. ‘उंद्री’ ही ग्रामीण भागातील शिवी देखील असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे होते. परिणामी, गावाच्या नामांतराचा लढा सुरू झाला. दरम्यान, १९८१ साली तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांना एक निनावी पत्र पाठवून ‘आमच्या गावाचं नाव बदलून द्या’ अशी मागणी उंद्री गावातून केली. मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ त्याची दखल घेऊन गावाच्या सरपंचांकडून त्याचा ठराव मागवून घेतला. तेव्हापासून नामांतरासाठी प्रयत्न सुरूच होते. सरपंच प्रदीप अंभोरे यांनी गावाच्या नामकरणासाठी पाठपुरावा केला.
हेही वाचा >>> नागपूर : अवघ्या चार दिवसांनी मुलाचे लग्न असताना, पतीने केला पत्नीचा खून
अखेर ३१ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासन राजपत्रात सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली. उंद्री या गावाचे नाव बदलून उदयनगर असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या पत्रातील अनुमतीनुसार महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे गावाच्या नामांतरणाचा आदेश देण्यात आला. या बदलाची नोंद राज्य शासकीय अभिलेखामध्ये घ्यावी, असे देखील त्यात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> अकोल्यात २९ तासांत २४ किमी महामार्गाची निर्मिती; रस्ता बांधणीचे काम अविरत सुरूच; विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल
पाच दशकांपासून सुरू होते प्रयत्न
नामांतरणाविषयी स्थानिकांशी चर्चा केली असता, मूळ उंद्री गावचे प्रतिष्ठित नागरिक अॅड. मोतीसिंह मोहता म्हणाले, ‘उंद्री गावाचे नाव बदलण्यासाठी साधारणत: ५० वर्षांपूर्वी लढा सुरू झाला. नामांतरणासाठी विविध पातळीवर प्रयत्न झाले. स्थानिकांनी पंचायत समितीपासून ते थेट पंतप्रधान, राष्ट्रपतींपर्यंत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. अखेर आता त्या मागणीची दखल घेण्यात आली. ‘उंद्री’ गाव आता ‘उदयनगर’ नावाने ओळखले जाणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद पसरला आहे.’
हेही वाचा >>> ‘यूपीएससी’ उत्तीर्णाच्या यशात सरकारी संस्थांची श्रेयसाठमारी; यशस्वी उमेदवारांवर एसआयएसी, ‘बार्टी’, ‘सारथी’चा दावा
गावातील एकोप्याचा ऐतिहासिक ‘उदय’
स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सर्वत्र दलित – सवर्ण असा वाद सुरू होता. त्यावेळी उंद्री या गावात १९३१ साली गावकऱ्यांनी दलित आणि सवर्ण यांच्यात एकोप्याचे संबंध निर्माण होण्यासाठी एका विहिरीतून पाणी, एकत्र जेवण असे आदर्श उपक्रम सुरू केले. या गावाने देशापुढे आदर्श ठेऊन एक नवा ‘उदय’ निर्माण केला. त्यामुळे गावाचं नामकरण उदयनगर करण्याचा ठराव घेऊन सरकारकडे तो पाठविण्यात आला. आता प्रत्यक्षात ‘उदयनगर’ नाव गावाला मिळाले. अनेक वर्षांच्या लढ्याला