वर्धा : भाजपमध्ये सध्या संघटनात्मक निवडणूक सुरू असून पक्षात महत्त्वाचे समजल्या जाणारे जिल्हाध्यक्षपद कुणाला ? हा लाखमोलाचा प्रश्न चर्चेत आला आहे. विद्यमान अध्यक्ष सुनील गफाट तसेच मिलिंद भेंडे,अतुल तराळे, प्रशांत बुरले, सुनील गाते, अशोक विजयकर, अर्चना वानखेडे अशी काही नावे पुढे आली आहेत. यापैकी एक होणार, हे निश्चित.रविवारी सायंकाळपर्यंत यावर चर्चा झाली. निरीक्षक संजय भेंडे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. प्रथम सर्व उपस्थित नेत्यांशी चर्चा झाली. राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, आमदार सुमित वानखेडे, दादाराव केचे, समीर कुणावार, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते. सामूहिक चर्चा झाल्यानंतर या प्रत्येक नेत्याशी भेंडे यांनी स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर इच्छुक उमेदवार यांना बोलावून अध्यक्ष का व्हायचंय, असा प्रश्न करण्यात आला.

सर्वांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर मतदान घेण्यात आले. ही प्रक्रिया आटोपली आणि मग कोण कोणाच्या पाठीशी या शंकेला उधाण आले. प्राप्त माहितीनुसार, बहुतांश नेते व इच्छुकांचा कल विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्याकडे दिसून आला. ऑफ द रेकॉर्ड हेच कानावर आले. मात्र आमदार दादाराव केचे यांनी माजी जि. प. सभापती मिलिंद भेंडे यांची तळी उचलून धरली. त्यांना विचारणा केल्यावर, हो, मी भेंडे यांचे समर्थन केले. ते जुने कार्यकर्ते आहे. बदल केला तर वाईट काय, अशी पृच्छा केचे यांनी केली. तसेच दोन इच्छुकांनी गफाट चालतील, पण बदल करायचा असेल तर मला संधी द्यावी, अशी विनंती केल्याचे समजते.

कुते म्हणजेच कुणबी – तेली सोडून अन्य उमेदवार द्यावा, असा सूर मागे उमटला होता. पण प्रत्यक्ष चर्चेत तो मागे पडल्याचे दिसून आले. सुनील गफाट म्हणतात की, मी पुन्हा संधी देण्याची विनंती केली आहे. तर माजी खासदार रामदास तडस म्हणाले की, आपण विशिष्ट नावाचा आग्रह धरलेला नाही. मतदान झाले आहे. ज्या इच्छुकास अधिक मते त्यास निवडा, अशी माझी भूमिका असल्याचे तडस सांगतात. एकूण काय तर गफाट हे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. आमदार केचे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुकीत केचे – वानखेडे चूरस उमेदवारीवेळी गाजली होती. बंडखोरीचा पवित्रा घेत केचे यांनी पदाधिकारी मेळावा बोलावला. मात्र ती बाब शिस्तभंग ठरत असल्याने मेळाव्यास पदाधिकाऱ्यांनी जाऊ नये, असे जिल्हाध्यक्ष म्हणून गफाट यांनी सूचित केले होते. ती बाब केचे यांनी मनाला लावून घेतल्याचे पक्षात बोलल्या जाते. भेंडे हे खरे तर रामदास तडस यांचे निष्ठावंत, पण त्यांना समर्थन केचे देतात, ही बाब पक्षातील ध्रुवीकरण स्पष्ट करते.