भंडारा : विधानसभा निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय झाला.मात्र या निकालावर संशय व्यक्त करत राज्यभरात ईव्हीएमवरून विरोधकांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे यासाठी लढा सुरू केला.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार परिणय फुके यांनी नाना पटोले यांनी ‘आमदारकीचा राजीनामा द्यावा मग बॅलेट पेपरवर मतदान घेऊ’ असे आव्हान केले. दरम्यान, नानांनी फुकेंचे आव्हान स्वीकारले असून ‘ बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे’ असा पलटवार करीत पटोले फुकेंसमोर पेच निर्माण केला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप नेते आमदार डॉ. परिणय फुके यांच्यातील वाक् युद्धाला पुन्हा तोंड फुटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोघांनी एकमेकांना धारेवर धरले आहे.
हेही वाचा…चर्चा तर होणारच! जाहिरातीच्या माध्यमातून भाजपचे मित्र पक्षावर दबावतंत्र…
काल साकोली विधानसभेतील लाखांदूर येथे काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी परिणय फुके यांना प्रतिउत्तर दिले. माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी ‘नाना पटोले यांनी अगोदर राजीनामा द्यावा आणि नंतर बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करावी, अशी टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना ‘बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी राजीनामा द्यायला तयार’ असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी जाहीर केले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या. ते म्हणाले की, ‘ भाजपच्या नेत्याने निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे पत्र आणावे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करू. १०० टक्के बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते परिणय फुके यांचे नावं न घेता दिला.
नाना पटोले काय म्हणाले…
‘बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी मी राजीनामा द्यायला तयार आहे. मात्र भाजपच्या नेत्याने निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. अशी मागणी करत नाना पटोलेंनी स्वतःचं मतं, व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गावागावात बॅलेट पेपरची मतदान मोहीम राबवा असं भाषणात सांगितले. ते म्हणाले, आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भागवत सप्ताह सुरू होईल. त्या भागवत सप्ताहमध्ये सुद्धा ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, ही स्वाक्षरी मोहीम चालविली पाहिजे, ही राजकीय मोहीम नाही.
हेही वाचा…मुख्यमंत्रीपद नागपूरला आणि या आमदारांनाही मंत्रिपद संधी…आठपैकी तब्बल…
‘माझं मतं सुरक्षित झालं पाहिजे, माझं व्यक्तिस्वातंत्र्य सुरक्षित राहीलं पाहिजे, ते सुरक्षित नसेल तर मी स्वतः ही सुरक्षित राहणार नाही. याला राजकारण कसं म्हणता येईल. हे राजकारण नसून, माझ्या मताची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी ही मोहीम राबवायची आहे. ही मोहीम मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या लोकशाहीसाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासाठी ही मोहीम चालवायचीय.’ असे पटोले म्हणाले.
परिणय फुके काय म्हणाले होते
पाच वर्ष स्वतःच्या मतदारसंघाशी सबंध न ठेवता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ईव्हीएमला दोष देत आहेत. पटोले यांना ईव्हीएमबाबत शंका असेल तर त्यांनी बॅलेटवर पुन्हा निवडणूक लढवावी. ईव्हीएम ही कॅल्यूलेटरसारखी मशीन आहे, ती हॅक होऊ शकत नाही. विकास नको, रोज टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकाना जनतेने नाकारले असल्याने आता ते ईव्हीएमला दोष देत आहेत. नाना पटोले निष्क्रिय असून त्यांची कार्यपद्धती आणि वागणूकीमुळे काँग्रेस पक्षातीलच नेते नाराज होते.
© The Indian Express (P) Ltd