“भाजपाला सत्तेच्या बाहेर जायची जेव्हा वेळ येते, तेव्हा तेव्हा गांधी, नेहरु परिवाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातो. जर, गांधी कुटुंबाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस कार्यकर्ते पेटून उठतील,” असा इशारा नाना पटोले यांनी भाजपाला दिला आहे. धनगर समाज कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त नाना पटोले आज अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नाना पटोले म्हणाले की, “केंद्रात नरेंद्र मोदीच भाजपा सरकार करत आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सातत्याने २०१४ पासून आपण या सरकारची भूमिका पाहिली आहे. तरीही गांधी परिवारातील सदस्याला साधा हातही लावू शकत नाही. या परिवाराच्या त्यागाची भूमिका या देशातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे. ज्या दिवशी या लोकांनी गांधी परिवाराला हात लावण्याचा प्रयत्न केल्यावर महाराष्ट्रासह देशातला काँग्रेस कार्यकर्ता व सामान्य माणूस पेटून उठेल. त्यामुळे त्याच्या वाटेला जाऊ नका हा आमचा प्रामाणिक आणि प्रेमाचा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला आहे.”
उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबीरात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी देशात धर्मांधता वाढत चालली आहे, असे म्हणाल्या होत्या. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोनिया गांधींच्या विधानाचे समर्थन केले आहे. आम्ही मोहन भागवत यांच्या भूमिकेचे स्वागत करतो, असे पटोले म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना पटोलेंनी सांगितले की, “राज्यसभेच्या निवडणुका या नेहमीच बिनविरोध होत असतात. ही महाराष्ट्राची परंपरा राहली आहे. त्यासाठी प्रयत्न झाले. पण, तरीही आमच्या चारही जागा निवडून येतील,” असा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला.