नागपूर : निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असून पोलीस वाहनातून रसद पाठवल्याच्या बातम्याही आल्या. आतातर भाजपाचे राष्ट्रीय नेते माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचे उघड झाले आहे. भाजपा शिंदे सरकारचा सपशेल पराभव होत असल्याने आता ते भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाच्या जोरावर जनतेची मते विकत घेऊन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असून भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात नाना पटोले यांनी माध्यमांना निवेदन पाठवले आहे. त्यात ते म्हणतात,  १९ नोव्हेंबर २०२४ रोजी विरारच्या हॉटेल विवांतामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. ही रक्कम ५ कोटी रुपये होती असे सांगण्यात येत आहे, विविध वृत्त वाहिन्यांवरही त्यासंदर्भातील बातम्या दाखवण्यात आल्या. विरारमधील पैसे वाटपाचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, हे प्रकरण दडपण्याचा प्रकार होऊ शकतो, पण निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्ष, पारदर्शक व कडक कारवाई करून कायद्याच्या राज्यात सर्व समान आहेत हे दाखवून द्यावे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भारतीय जनता पक्ष व विनोद तावडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा >>>Anil Deshmukh Attack: काँग्रेसच्या उमेदवाराने देशमुखांवर हल्ला केला, भाजप नेत्याचा अजब दावा

निवडणूक आयोगाला सवाल

विधानसभा निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे परंतु महिना भरातील घटना पाहता सत्ताधारी पक्षांवर कारवाई केली जात नसून फक्त विरोधी पक्षांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या बॅगा तपासणे, त्यांना विमान व हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी न देणे, विलंब लावणे असे प्रकार झाले आहेत. सुरवातीला तक्रारी केल्यानंतर सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात असल्याचे दाखवण्यात आले. खेड शिवापूर भागात पुणे महामार्गावर १५ दिवसापूर्वी एका वाहनातून ५ कोटी रुपये सापडले, पण अद्याप ते पैसे कोणाचे हे पोलिसांनी जाहीर केले नाही, या प्रकरणाचे पुढे काय झाले हेही स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा >>>Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांच्या हल्यामागे ‘या’ भाजप नेत्याचा हात… प्रवीण कुंटे पाटीलांनी थेट नावच घेतले..

नाशिकच्या एका हॉटेलातही मोठ्या प्रमाणात पैसे सापडले त्याचा संबंधही सत्ताधारी पक्षाशी असल्याचे उघड झाले पण पोलीस कारवाई समाधान कारक झाली नाही. विरोधकांच्या बॅगांमध्ये काहीही आढलेले नाही पण सत्ताधारी पक्षांच्या बॅगांमध्ये पैशांचे घबाड सापडण्याचे प्रकार उघड झाले आहेत. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली व त्यात ते जखमी झाले आहेत, असे पटोले यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole allegation on bjp vinod tawde money distribution case rbt 74 amy