लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : भारत जोडो अभियानात सक्रिय शहरी नक्षल संघटना आणि त्या संघटनेच्या प्रमुखांची नावे जाहीर करण्याचे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यासंदर्भात पटोले यांनी फडणवीस यांना शुक्रवारी पत्र पाठवले आहे.

गुरुवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानात शहरी नक्षल संघटना सक्रिय होत्या, असा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी २०१२ मध्ये तत्कालिन भाजप आमदार गिरीश बापट यांनी विचारलेल्या प्रश्नावर तत्कालिन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलेल्या उत्तराचा आधार घेतला होता. महाराष्ट्रातील काही फ्रंटल ऑर्गनायजेशनची नावे आर.आर. पाटील यांच्या उत्तरात शहरी नक्षल संघटना म्हणून आहे, असा दावा फडणवीस यांनी केला होता. पण, त्यांनी त्या संघटनांची नावे सांगितली नव्हती. आता काँग्रेसने त्या संघटना आणि त्यांच्या प्रमुखांची नावे उघड करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

आणखी वाचा-स्वत:ला आगीत झोकून सिलिंडर बाहेर काढणाऱ्या करिनाच्या धाडसाची दखल…

पुरोगामी महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना अनेक वर्षांपासून गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करीत आहेत. राज्यात व देशात लोकशाही भक्कम व्हावी यासाठी अशा संघटना कार्यरत आहेत. या सामाजिक संघटनांसह विचारवंत, ज्येष्ठ नागरिकही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. अशा संघटनांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादी संबोधणे अत्यंत चुकीचे आहे. भारत जोडो यात्रेला संघटनांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली, त्या विविध संघटनांचे दाखले देत त्या संघटना नक्षलवादी आहेत, असे संबोधले. त्या संघटना व संघटना प्रमुखांची यादी आम्हाला द्यावी, अशी विनंती पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.

आणखी वाचा-अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…

काय म्हणाले होते पटोले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर गुरुवारी प्रतिक्रिया देताना बोलताना नाना पटोले म्हणाले , राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तेंव्हा देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते. त्यांच्याकडे अशी काही माहिती होती तर त्याचवेळी त्यांनी कारवाई करायला हवी होती. कारवाई न करणारे फडणवीस अकार्यक्षम गृहमंत्री आहेत असे म्हणायचे का. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, राहुल गांधी व भारत जोडो यात्रेची लोकप्रियता भाजपाला सहन होत नाही म्हणून भाजपाकडून असा अपप्रचार केला जातो.

भाजपाच्या गुंडांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याच्या निषेध करण्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole challenge to devendra fadnavis to declare names of active urban naxal organizations and their leaders in bharat jodo campaign rbt 74 mrj