गोंदिया : सुप्रीम कोर्टाने प्रतोद म्हणून आमदार सुनील प्रभू यांना मान्यता दिली आहे. प्रभू हे उद्धव ठाकरे गटाचे आहेत. त्यांनी दिलेल्या नोटीसचे पालन न केल्यास हा मार्ग अपात्रतेकडे जातो. भारतीय संविधानातील शेड्यूल १० मध्ये ही संपूर्ण प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमुळेच शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरणारच, अशी भविष्यवाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पोळानिमित्ताने आपल्या सुकडी गावात आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाही तर देवेंद्र फडणवीस यांचे पाप आहे. भाजपाला सत्तेत आणण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये मराठा, धनगर, हलबा यांना आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले. आता केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार आहे, मग त्यांनी या सर्व समाजाला आरक्षण द्यावे, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा – भंडारा: अंघोळीकरिता गेला अन् नदीत बुडाला; शोध सुरू
विदर्भात चांगला पाऊस पडत आहे, पण महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, प. महाराष्ट्र या अनेक ठिकाणी पाऊसच नाही. या भागांसाठी उपाययोजना करण्यात सरकार मागे पडते आहे. सरकारची भूमिका शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे, शेतीचा खर्च वाढविणे, शेतमालाला भाव न मिळू देणे, अन्नदात्याला आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करणे, ही जी पापवृती सत्तेमध्ये बसून भाजपा करते आहे, ती चुकीची आहे, असेही पटोले यांनी सांगितले.