नागपूर : काँग्रेसची सत्याग्रह यात्रा ठाणे जिल्ह्यातून सुरू होत असून, या यात्रेत सावरकरांचे छायाचित्र राहणार नाही. ठाणे काँग्रेस शहराध्यक्षांना ‘मिसकोट’ करण्यात आले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे स्पष्ट केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून सत्तारूढ भाजपाने सावरकर गौरव यात्रा काढली. त्याची सांगता नागपुरात झाली. आता काँग्रेस सत्याग्रह यात्रा काढणार आहे. या यात्रेत सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी म्हटले होते. मात्र, नाना पटोले यांनी त्यांचे हे विधान खोडून काढले आहे.
हेही वाचा – बुलाढाणा : पळशी खुर्द येथे वीज पडून ८ बकऱ्या ठार, खामगाव तालुक्यात पावसाची अवकाळी हजेरी
पटोले म्हणाले, ठाणे अध्यक्षांशी काल (गुरुवारी) बोलणे झाले. त्यांनी यात्रेत सावरकर यांचे छायाचित्र राहणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्यविरांचा सन्मान म्हणून त्यांची छायाचित्रे यात्रेत वापरली जाणार आहेत. ठाणे जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या काँग्रेसच्या सत्याग्रह यात्रेत स्वातंत्र्यविरांच्य छायाचित्रांना स्थान देण्यात येणार आहे.
हेही वाचा – ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी, पुढील ४८ तास धोक्याचे
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली. त्यानंतर हात से हात जोडो काढण्यात आली. आता जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने घेतला असून,या यात्रेची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक पहिल्यांदाच ठाण्यात होणार आहे. येत्या १० एप्रिलला ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.