नागपूर : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची लाच ऑफर केली होती, असा आरोप केला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यावर भाजपा गप्प का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
एका मुलाखतीमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हा आरोप केला होता. त्यावर पटोले म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, अशा गर्जना करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या राज्यात ३०० कोटींची ऑफर राज्यपालांना दिली जाते हे स्वतः मलिक सांगत आहेत. त्यावर भाजपाकडून एक शब्दही का काढला जात नाही. सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती संशयाचे ढग गडद झाले आहेत. सत्यपाल मलिक हे भाजपाचेच नेते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर उत्तर देऊन सत्य काय आहे ते जाहीर करावे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे ते म्हणाले.