देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती व जेष्ठ काँग्रेस नेते देवीसिंह शेखावत यांच्या निधनाने काँग्रेसने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे, अशा शोक संवेदना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या.देवीसिंह शेखावत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय होते. १९७२ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून पी.एच.डी. केली.
हेही वाचा >>>रेल्वे प्रवाशांवर तिप्पट भार; मुंबई एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय, ‘रेल रोको’ आंदोलनाचा इशारा
विद्याभारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. देवीसिंह शेखावत हे अमरावती महानगरपालिकेचे पहिले महापौर होते तसेच १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत अमरावतीमधून निवडून आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्यही होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचाराचा एक सच्चा पाईक काळाच्या पडद्याआड गेला.देविसिंह शेखावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शेखावत-पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.