लोकसत्ता टीम
गोंदिया : “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,” ही म्हण आपण ऐकलीच असेल. याची प्रचिती भंडारा जिल्ह्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी गाव येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या आईचे पार्थिव पाहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भावनिक झाले होते. यावेळी नाना पटोले ढसाढसा रडले. राजकारणामध्ये एक कणखर नेतृत्व म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांना असे रडताना पाहून अनेकांचा कंठ दाटून आला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या सर्वांनीच आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी मीराबाई पटोले यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
आणखी वाचा-शिर्डीच्या साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे धीरेंद्र शास्त्री गजानन महाराजांच्या चरणी
आईसोबतच्या आठवणी
अंत्यसंस्काराच्या वेळी नाना पटोले हे आपल्या आईसंदर्भातील आठवणी अनेकांना सांगताना दिसले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी नाना पटोले यांनी आपल्या आईचे आवर्जुन आशीर्वाद घेतले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरदेखील नाना पटोले यांनी मातोश्रींचे आशीर्वाद घेतले. त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मीराबाई पटोले यांचे रविवारी पहाटे नागपूर येथे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी माजी मंत्री तथा भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील अनेक नेते, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. आमदार विजय वडेट्टीवार यांनी मीराबाई पटोले यांना श्रद्धांजली वाहिली. या कठीणप्रसंगी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब पटोले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, असे वडेट्टीवार म्हणाले.
आणखी वाचा-अकोल्यात गॅस टँकर उलटला; सुदैवाने जयपूर अपघाताची पुनरावृत्ती टळली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मीराबाई पटोले यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीदेखील सोशल मीडियावर मीराबाई पटोले यांचा फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर भंडाऱ्याच्या सुकळी या स्वगावी चुलबंद नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.भंडारा जिल्ह्यातील सुकळी हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मूळ गाव आहे. ग्रामीण परंपरेनुसार मीराबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. नाना पटोले यांच्यासह त्यांचे भाऊदेखील यावेळी हजर होते.