नागपूर : सरकार जनतेचे एकही प्रश्न सोडवू शकले नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापूस, ऊस, द्राक्ष उत्पादक आज त्यांच्या हातात काही नाही. काँग्रेस पक्षाने सरकारवर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून दोन दिवस भाजपाने नागपुरात रोजगार महामेळावा घेऊन तरुणांची थट्टा चालवली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्या विधानभावनावर काँग्रेसचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा बेरोजगारी, महागाई या विषयाला धरून असणार आहे. २३ सप्टेंबर रोजी पावसाने मोठे नुकसान केले. मात्र अजूनही मदत मिळाली नाही. अनेक ठिकाणी रस्ते खोदकाम सुरू आहे. रस्त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज्यात सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावरून सरकार प्रायोजित आंदोलन सुरू आहे, ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवून सामाजिक परिस्थिती मलीन करण्याचे काम सुरू आहे, अधिवेशनात सरकारच्या पापाचा पाढा वाचणार आहे. आज दोन समाजांत अंतर वाढले आहे. भविष्यात कमी होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राला आपसात भांडवत कलंकित करण्याचे काम सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.
आरक्षण मिळण्यासाठी संवैधनिक पद्धती आहे. जातीय सर्वेक्षण करून त्यांना आरक्षण देता येऊ शकते. जातीय सर्वेक्षण करून यातून तोडगा काढू शकतो. मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत, अजूनही अनेक जाती प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी जनगणना गरजेची आहे. आज विविध समाजांचे अनेक प्रश्न आरक्षणाच्या नावावर निर्माण झाले आहेत, असेही पटोले यांनी सांगितले.