गोंदिया : जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे. अहंकार आणि आम्ही जे केले तेच बरोबर, अशी भाजपाची मानसिकता झाली आहे. यामुळेच अनेक नेते पुढच्या काळात भाजपा सोडतील यावेळी केंद्रात भाजपाचे, मोदींचे सरकार येणार नाही. मग महाराष्ट्र आणि देशात भाजपाची अवस्था काय होईल, ते चित्र स्पष्ट आहे, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले गोंदिया येथे निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीच्या यादीत मुस्लीम उमेदवारांचे नाव का नाही? असा प्रश्न केला असता पटोले म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचे तिकीट वाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुढे आणखी काही नावे पहायला मिळतील. आमच्याकरिता तो मुद्दाच नाही. भाजप आणि त्यांचे नेते राज्यात आणि देशात महागाई, बेरोजगारीवर चर्चा का करत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा का करत नाही, गरिबांच्या प्रश्नावर चर्चा का करत नाही.
सर्वसामान्यांशी निगडीत नसलेले मुद्दे माध्यमांद्वारे समोर आणायचे आणि मूळ मुद्यांपासून लोकांना डायव्हर्ट करायचे, भाजपने मागील दहा वर्षे हाच धंदा केला. पण आता असे चालणार नाही. मतदारांनी मानसिकता बनवली आहे आणि आता ‘इंडिया’ आघाडीला निवडून द्यायचा, असा मानस मतदारांचा आहे. मी आपल्या सभांमधून महाविकास आघाडीला निवडून द्यायचे आवाहन जनतेला करत आहे. मतदारांनी भाजपाच्या धर्म-जाती या मुद्यांपलीकडे मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पटोले म्हणाले.