नागपूर : निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात काम करत आहे. उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाला फटकारल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्याबाबत बोलताना पाटोले म्हणाले, निर्धारित मुदतीमध्ये निवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे प्रशासक आणि सरकार कारभार चालवित असून त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. प्रशासनाचे लक्ष नसल्याने राज्यात सर्वत्र डेंग्युचे रुग्ण वाढले आहेत, असेही पाटोले म्हणाले.

हेही वाचा – “फडणवीसांचा उद्योगमंत्र्यांवर दबाव”, कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून रोहित पवारांचा आरोप

हेही वाचा – चंद्रपूर : फाऊंटेन घोटाळ्याविरोधात जनविकास सेनेचे प्रतीकात्मक आंदोलन

भाजपा, फडणवीस आरक्षणावरून राज्य पेटवताहेत

सरकार ओबीसींवर अन्याय करत असल्याचे स्वत: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सभागृहात म्हणाले. एकीकडे सरकार मराठ्यांना आरक्षण देणार, असे सांगत आहे. तर दुसरीकडे भुजबळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याची भूमिका मांडत आहेत. या पद्धतीने ओबीसीविरुद्ध मराठा असा वाद लावून महाराष्ट्र पेटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामागे भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा थेट आरोप पटोले यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticize central government over the election commission what did nana patole say in nagpur mnb 82 ssb