लोकसत्ता टीम
गोंदिया: महाराष्ट्रातील हे ‘ईडी’चे असंवैधानिक सरकार राज्यात आल्यापासूनच राज्याचे तीन तेरा वाजले आहे. जनतेचे प्रश्न दररोज वाढतच चालले आहे, खारघरचे उष्माघात मृत्यू प्रकरण, शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रश्न, बेरोजगारी, महागाई या गंभीर प्रश्नावर हे सरकार बोलायला तयार नाही आणि हे प्रश्न आता वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री संपावर गेले की सुट्टीवर गेले हे प्रश्न आता महाराष्ट्राची जनता विचारत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पटोले हे बाजार समितीच्या निवडणुक प्रचारकरिता जिल्ह्यात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. पुढच्या निवडणुकीत मोदी नावाच्या वादळात विरोधक उडून जाणार या बावनकुळेंच्या वक्तव्यावर पटोले म्हणाले, की हे वादळ आता देशात लोकशाही संपवायला निघाले आहे. अशा वादळाचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. जनतेने यांना संपविण्याचा व भाजप मुक्त भारत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुठल्याही वादळाचा फरक पडणार नाही.
आणखी वाचा-गारांचा चौफेर मारा, नागपूर जिल्ह्यात १२ हजार कोंबड्यांचा मृत्यू
राज्यात कोणतीही योजना किंवा प्रकल्प आणले जात असताना यांचेच बगलबच्चे त्या प्रकल्पाच्या बाजूला जागा घेतात आणि मग त्यांच्याचसाठी ही योजना राबविली जाते, प्रकल्प उभारले जातात असे चित्र आपण सातत्याने राज्यात बघतो. आणि मग त्यातून मागे घडली तशी पत्रकारांच्या खून करण्यापर्यंत मजल मारली जाते.
काँग्रेस पक्षाचा बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध नाही. पण त्यातील स्थानिक जनतेची, समर्थकांची, विरोधकांची भूमिकाही समजून घेतली पाहिजे. ज्या प्रकारे हे सरकार तानाशाही पद्धतीने वागते आहे, लोकांना उन्हात तडफडून मारत आहे, अशांनी आम्ही यात राजकारण करण्याची भाषा बोलू नये. प्रकल्पातील स्थानिकांशी चर्चा करत मध्यम मार्ग काढण्यात यावा ही यात काँग्रेसची भूमिका असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.