नागपूर : देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा मध्य प्रदेश सरकारची उदाहरणे देत शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याची मागणी करीत होते. आता ते स्वत:च अर्थमंत्री आहे तर त्यांना वीजबिल माफीच्या मागणीचा विसर पडलेला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी गुरुवारी बोलत होते.
देशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त झाली आहे. परंतु, भाजपचे केंद्र आणि राज्य सरकार काहीच करायला तयार नाही. राज्यात तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठाही केला नाही आणि पीक विमा देखील दिला जात नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा – विदर्भातील शेतकरी पुत्राचा ब्रिटनमध्ये सन्मान
फडणवीस विरोधी पक्षनेते असताना मध्य प्रदेश सरकारचे गुणगाण करीत होते. मध्य प्रदेश सरकारने शेकडो शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असे सवाल आवेशात विचारत होते. आता ते अर्थमंत्री असताना त्यांना सर्व गोष्टी स्मरत नाही. सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, असेही नाना पटोले म्हणाले.