नागपूर : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. शासन व प्रशासनात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारला फक्त मलई खाण्यात जास्त रस असल्याने जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे सातत्याने होत असलेल्या घटनांवरून दिसत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नागपूर येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, पुण्यात शाळकरी मुलीवर व्हॅन चालकाने अत्याचार केला. त्याआधी एका कॉलेजमध्ये मुलीवर अत्याचाराची घटना घडली. आता बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या या घटना आहेत. सावित्रीबाईंच्या भूमीत अशा घटना वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. याला सरकारच जबाबदार आहे. या सरकारचे शेवटचे दिवस उरले आहेत. त्यांनी काही कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : अमरावती: “अपूर्ण विमानतळाचे लोकार्पण करण्‍याचा घाट..”, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांची टीका

नरहरी झिरवळ यांच्या आंदोलनावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली धनगर, आदिवासी समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण ते पूर्ण केले नाही. आरक्षणाच्या नावावर भाजप व फडणवीस यांनी जाती-जातीत भांडणे लावली. आज तेच लोक त्यांना जाब विचारत आहेत. ज्यांनी आश्वासन दिले त्यांना आता त्याची पूर्तता करावी लागणार आहे. यावेळी एका एनजीओच्या महिला सुरक्षासंदर्भातील ॲप नाना पटोलेंच्या हस्ते लाँच करण्यात आले. हे ॲप महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे आहे, असे पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मुलींवर अत्याचाराच्या सातत्याने घटना घडत आहेत. पण, राज्य सरकार त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. बदलापूर येथील शाळेत मुलींवर अत्याचार, नागपुरात ८ वर्षीय चिमुकल्या मुलीवर २० रुपयाचे आमिष देऊन अत्याचार केल्याची घटना घडली. पुण्यात व्हॅन चालकांकडून दोन मुलींवर अत्याचार आणि बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे, असे पटाेले म्हणाले.

हेही वाचा : समृद्धी महामार्ग अपघात: २५ पीडित कुटुंबांची दीड वर्षांपासून ससेहोलपट

मोदी संतांशीही खोटे बोलतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्रात पोहरादेवीला येत आहेत. पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीला भेट दिली होती. त्यावेळी बंजारा समाजाला आदिवासी जातीत समावेश करण्याचे लेखी आश्वासन रामराव महाराज यांना दिले होते. ते अद्याप पूर्ण केलेले नाही. नरेंद्र मोदी संतांशीही खोटे बोलतात त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? पोहरादेवीला जगभरातील बंजारा लोक येतात, मोदींच्या जुमलेबाजीला व भूलथापांना आता बंजारा समाज बळी पडणार नाही, असेही पटोले म्हणाले.