नागपूर : भाजप आणि पंतप्रधानांना ‘इव्हेंट’ करून कायम प्रकाशझोतात राहण्याची सवय जडली आहे. इव्हेंटमध्ये त्यांना कोणी मागे टाकू शकत नाही. सर्व काही ठरलेला मामला असतो. प्रयागराजमध्ये मोदींनी केलेले स्नान हा देखील त्याचाच भाग होता. त्यांच्या अशा इव्हेंटबाजीमुळे आणि व्हीआयपी कल्चरमुळे मात्र मौनी अमावस्येला भाविकांचा नाहक जीव गेला, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात स्नान केले. यासंदर्भात पटोले यांना विचारले असता, ते म्हणाले, “इव्हेंट करण्यात भाजप आणि मोदींना कोणीही मागे टाकू शकत नाही. सर्व काही ठरवून, नाटकीय पद्धतीने केले जाते’महाराष्ट्रात ओबीसींची स्थिती फार वाईट आहे ओबीसीची मत भाजप घेत आहे पण सातत्याने त्यांच्यावर अन्याय करते. हे आम्ही आधीपासून सांगत होतो. आता मंत्रिमंडळातीलच मंत्री ओबीसींवर अत्याय होत असल्याचे म्हणत असतील तर आम्ही जे म्हणत होतो खरे आहे, हे स्पष्ट झाले. ओबीसींच्या विविध प्रश्नावर भाजप जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांनी आपले भूमिका मांडली. भुजबळ ओबीसींचे नेतृत्व करतात त्यांना अपमानित करण्यात आले, असे पटोले म्हणाले.
ओबीसींच्या नियुक्तीचा मुद्दा
ओबीसी उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना नियुक्ती दिली जात नाही. भाजप हे सर्व ठरवून करीत आहे. यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ओबीसी उमेदवारांना जाणिवपूर्वक नॉन क्रिमीलेयरची अट घालून तरुण पिढीचे आयुष्य बरबाद केले जात आहे. ही गंभीर बाब असून आम्ही विधानसभेत मुद्दा उपस्थित करू, असेही पटोले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्याला अर्थ नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंचच्या हत्याबाबत संपूर्ण माहिती आहे. या प्रकरणातील मुख्य आरोप अद्याप मोकाट आहेत. पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. बदलापूर बनावट चकमकीत आरोपीचा खून करण्यात आला. पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही चकमक कोणाच्या आदेशाने घडली. बीड किंवा परभणी प्रकरणातही सरकार सत्य लपावत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.