लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. यापूर्वी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या झाली होती तर चित्रपट अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून कायदा सुवस्थेचे धिंडवडे निघाले आहे.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. हे सरकारचे अपयश आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आणखी वाचा-विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाजपा सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रिय आहेत. मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत. बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशीर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही.

आणखी वाचा-कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून, नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house rbt 74 mrj