लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : महायुतीचे सरकार निवडणुकीच्‍या तोंडावर अनेक योजना जाहीर करीत आहे, आता त्‍यांनी ‘लाडकी आमची खुर्ची’ ही योजना आणली आहे. महायुतीचा मुख्‍यमंत्रीपदाचा दावेदार कोण, हे आता त्‍यांनाच विचारले पाहिजे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

नाना पटोले म्‍हणाले, भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. निवडणुकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू. महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्र वाचविणे ही काँग्रेसची प्राथमिकता आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

आणखी वाचा-अकोला : आमदार नितेश राणेंना दाखवले काळे झेंडे, पोलीस बॉईज संघटना आक्रमक

काँग्रेस पक्षासाठी मुख्‍यमंत्री कोण हा प्राथमिकतेचा मुद्दा नाही. ज्‍या पद्धतीने महायुतीचे सरकार महाराष्‍ट्राचा एकेक भाग विकण्‍याचे काम करीत आहे, त्‍यांच्‍यापासून महाराष्‍ट्राला वाचवणे, हे महत्‍वाचे काम आहे. काँग्रेसमध्‍ये लोकशाही व्‍यवस्‍था आहे. निवडून आलेल्‍या आमदारांमधून नेत्‍याची निवड करण्‍याची काँग्रेसची परंपरा राहिली आहे. महाविकास आघाडीच्‍या आमदारांच्‍या सर्वसहमतीने मुख्‍यमंत्री निवडला जाईल, असे नाना पटोले म्‍हणाले. काँग्रेसची ताकद लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी महाराष्‍ट्राला दिसली आहे. यावेळीही निवडून येण्‍याची क्षमता असलेल्‍या लोकांनाच उमेदवारी दिली जाईल, स्‍थानिक नेतृत्‍वाचे मत विचारात घेतले जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असले तर त्यांनी सांगावे, असे वक्‍तव्‍य शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी काल, मंगळवारी केले होते, त्‍यावर प्रतिक्रिया विचारली असता काँग्रेसला संजय राऊत यांच्‍या विधानावर कुठलीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्‍याची गरज नाही, असे नाना पटोले म्‍हणाले.

आणखी वाचा-पालकमंत्री आत्राम यांची हुकूमशाही, डीपीडीसी सदस्यांना बोलण्यास मनाई

नाना पटोले म्‍हणाले, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारच्‍या काळात शेतकरी आत्‍महत्‍यांचा प्रदेश, बेरोजगारांचा प्रदेश ही महाराष्‍ट्राची ओळख बनली आहे. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. शेतकरी अधिकाधिक संकटात जात आहे. बेरोजगारांची संख्‍या वाढत आहे. अनेक प्रकल्‍प गुजरातमध्‍ये पळवले जात आहेत. महाराष्‍ट्रात आता पोकलँडचा खेळ सुरू आहे. त्‍याची तीन तोंडे आहेत. महाराष्ट्राची लूट सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole critisize mahayuti says they has come up with the scheme ladki amchi khurchi mma 73 mrj